Aurangabad : औरंगाबाद स्मार्ट सिटीत नोकर भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad municipal corporation

Aurangabad : औरंगाबाद स्मार्ट सिटीत नोकर भरती

औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने सिटी बस विभागासाठी कंत्राटी तत्त्वावर नोकर भरती करण्यात येत आहे. यात विविध संवर्गातील ३१ पदासाठी १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान थेट मुलाखती होणार आहेत.

औरंगाबाद स्मार्ट सिटीच्यावतीने सिटी बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सिटी बस सेवेसाठी ऑफिस स्टाफ भरण्यात येणार आहे. यामध्ये क्लर्क, मेकॅनिक, एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर आणि असिस्टंट मॅनेजर या संवर्गातील ३१ पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान सिटी बससाठी चालक आणि वाहक खासगी एजन्सीच्या माध्यमातून आऊटसोर्सींग पद्धतीने घेण्यात आलेले आहे. मात्र, आता ऑफिस स्टाफ हा थेट स्मार्ट सिटीच्यावतीने भरती केला जात आहे.

ही भरती कंत्राटी तत्त्वावर असणार आहे. त्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटीच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार स्मार्ट सिटीत एक असिस्टंट मॅनेजर(ऑपरेशन), २ टेक्निकल सुपरवायझर, १ एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर, ९ क्लर्क आणि १८ मेकॅनिक भरले जाणार आहेत. या सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी असणार आहे. क्लर्क, एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी १ नोव्हेंबरला मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तर मेकॅनिक पदासाठी ४ नोव्हेंबरला मुलाखती होतील. आमखास मैदानाजवळील स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत या मुलाखती होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीस हजर राहावे, असे स्मार्ट सिटीच्यावतीने कळविण्यात आले आहे.