Aurangabad दिवाळीनंतरही एसटी-रेल्वेत तुडूंब गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : दिवाळीनंतरही एसटी-रेल्वेत तुडूंब गर्दी

औरंगाबाद : भाऊबीजनंतर परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. कामानिमित्त बाहेर गावी असणारे किंवा शहरात येणाऱ्यांची एकच झुंबड उडाल्याने मुख्य बसस्थानकांसह सिडको बसस्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी दिसून आली. त्याच प्रमाणे रेल्वे स्थानकातही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. गर्दीमुळे प्रवाशांची होणारी अडचण दूर करण्यासाठी एसटीतर्फे विविध मार्गावर जादा बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्य बसस्थानकाचे आगार प्रमुख संतोष घाणे यांनी दिली.

दिवाळी निमित्त व विकेंडला शहराबाहेर गेलेले परतीच्या मार्गावर लागले आहेत. अनेक जण दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या मुळ गावी गेले होते. तेही भाऊबीजनंतर कामावर परतत आहेत. तर सलग सुट्ट्यांमुळे विकेंड साजरा करण्यासाठी विविध ठिकाणी गेलेले परतीच्या मार्गावर असल्याने सर्वच मार्गावर तोबा गर्दी झाली आहे.

अचानक गर्दी वाढल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांना विविध मार्गावर जादा बसची व्यवस्था केली आहे. पुणे, धुळे जळगाव, भुसावळ या मार्गांवर जास्त गर्दी असल्याने या मार्गावर अधिक बस पाठवण्यात येत आहेत. एसटी प्रमाणेच विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेनांही तेवढीच गर्दी आहे. एसटी महामंडळाने ३१ ऑक्टोबर पर्यंत जादा बसचे नियोजन केले आहे. परंतु गर्दी अशीच राहिली तर ही सेवा वाढवण्यात येणार असल्याचीही माहिती घाणे यांनी दिली.

पुण्यासाठी विक्रमी कालावधी!

औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा आज मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सिडको बसस्थानकातून सकाळी साडेदहाच्या सुमारास निघालेली एसटीची साधी बस रात्री नऊला वाकडेवाडी (पुणे) स्थानकात पोचल्याचा अनुभव पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या येथील एका विद्यार्थिनीने सांगितला. वाकडेवाडीतून घर गाठेपर्यंत रात्री सव्वादहा झाले होते. येथील मुख्य बस स्थानकातून सकाळी साडेअकराला निघालेली अशीच एक अन्य साधी बस वाघोलीत रात्री सव्वादहाच्या सुमारास पोचली.

तेथून वाकडेवाडीत जायला आणखी वेळ लागला, तो वेगळाच! पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणारी येथील विद्यार्थिनी आपल्या पालकांसह या बसमधून प्रवास करीत होती. जागाच नसल्याने बसच्या पायऱ्यांवरही काही बसले होते! प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे साडेपाच ते सहा तासांचा प्रवास दहा ते अकरा तासांवर गेल्याने प्रवाशांना हाल सहन करावे लागल्याचे विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितले. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने मार्ग काढताना बसचालकांनाही मोठी कसरत करावी लागली. तेही त्रस्त झाल्याचे चित्र होते.

ट्रॅफिक जामने वाहनचालक त्रस्त

दिवाळीनंतर परतीच्या प्रवासाला निघालेले चाकरमनी, विद्यार्थी, व्यावसायीक अशा सर्वच घटकातील नागरिक प्रवासाला निघाल्याने रस्ता वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला आहे. विशेषतः पुणे मार्गावर सर्वाधिक वाहतूक खोळंबा झाला. औरंगाबादहून निघाल्यानंतर नगर रोडवरील लोखंडी पूल, वाळूज, घोडेगाव, शिक्रापूर, वाघोली, रांजणगाव अशा ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होती. प्रत्येक ठिकाणी साधारण एक ते तीन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पाच साडेपाच तासाच जाणाऱ्या एसटी बसला सहा ते आठ तास लागल्याचे प्रवाशांनी सांगितले.