
औरंगाबाद : अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ
पाचोड : पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील थेरगाव (ता.पैठण) येथे रस्त्यालगत बुधवारी (ता.१८) पस्तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून पुलाजवळील नदीत फेकून दिल्याची घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील थेरगाव (ता.पैठण) जवळील पुलालगत नदी पात्रात असलेल्या खोल नालीत लाल रंगाच्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून तीस-पस्तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती शेतकऱ्यांसह रस्त्याने जाणाऱ्यांनी पाचोड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी त्यांच्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी रस्त्याच्या कडेला पुलालगत सभोवताली असलेल्या वेड्या बाभळीच्या गर्द दाट झाडीच्या नदीपात्रातील नालीत खून करून अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली असता प्रेताजवळ संशयास्पद कोणतीही वस्तू आढळून आली नाही. शरीरावर मारहाणीच्या अनेक जखमा दिसून येत होत्या.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी उत्तरीय तपासणी केली. संबंधित मृताची ओळख पटेपर्यंत मृतदेह औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे आदींनी भेट देऊन पाहणी केली. मृताची अद्याप ओळख पटली नसून पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून घटनेची नोंद केली. या घटनेमुळे सर्वत्र परिसरात खळबळ उडाली. तपास सपोनि. गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चव्हाण, प्रशांत नांदवे, किशोर शिंदे, फेरोझ बरडे करीत आहे.