पर्यटनाच्या राजधानीला ‘कोंडी’चे ग्रहण कधी सुटणार?

पर्यटनाच्या राजधानीला ‘कोंडी’चे ग्रहण कधी सुटणार?
Published on: 
पर्यटनाच्या राजधानीला ‘कोंडी’चे ग्रहण; सुटणार कधी? -- ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराला राज्याची ‘पर्यटनाची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर, अजिंक्य देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा आणि ऐतिहासिक पाणचक्की अशा जागतिक दर्जाच्या वास्तू या जिल्ह्याच्या वैभवात भर घालतात. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक या ऐतिहासिक ठेव्याचा आनंद घेण्यासाठी शहरात दाखल होतात. मात्र, पर्यटनाची ही राजधानी सध्या वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि प्रशासकीय उदासीनतेच्या विळख्यात अडकली आहे. पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्याऐवजी त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, ही परिस्थिती येथील पर्यटन विकासासाठी मोठा अडथळा ठरत आहे. शहरातील आणि परिसरातील प्रमुख पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था आणि त्यावरील वाहतूक कोंडी हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. विशेषतः जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना देवगिरी किल्ल्याच्या घाटात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. सुट्यांच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. तासन् तास अडकून पडल्याने पर्यटकांचा वेळ वाया जातो आणि प्रवासाचा उत्साहही मावळतो. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी मार्ग उभारण्याची नितांत गरज आहे. केवळ शहराबाहेरीलच नव्हे, तर शहराअंतर्गत पर्यटनस्थळांपर्यंत पोचणेही पर्यटकांसाठी जिकिरीचे झाले आहे. बीबी का मकबरा, पाणचक्की आणि इतर ऐतिहासिक दरवाजांकडे जाणाऱ्या मार्गांवर अरुंद रस्ते आणि बेशिस्त वाहतुकीमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. याला सर्वांत मोठे कारण म्हणजे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्याप म्हणावी तितकी सक्षम झालेली नाही. महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘सिटी बस’ सेवा काही मोजक्याच मार्गांवर मर्यादित आहे. प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारी स्वतंत्र, नियमित आणि पर्यटकांना सहज उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा नसल्याने पर्यटकांना खासगी वाहनांच्या अव्वाच्या सव्वा दरांचा भुर्दंड सोसावा लागतो. या सर्व समस्यांच्या मुळाशी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वाची उदासीनता असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठा महसूल आणि रोजगार मिळू शकतो, याची जाणीव असूनही धोरणात्मक पातळीवर ठोस पावले उचलली जात नाहीत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि स्थानिक महापालिका व जिल्हा प्रशासन यांच्यात समन्वयाचा मोठा अभाव दिसून येतो. या प्रमुख विभागांनी एकत्र येऊन पर्यटन विकासाचा कृती आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. तसेच, स्थानिक स्वयंसेवी संस्था, पर्यटन व्यावसायिक आणि नागरिकांचा सहभाग वाढवून पर्यटनाबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे. दुर्दैवाने, अशा सामूहिक प्रयत्नांचा अभाव असल्याने छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनाला अपेक्षित गती मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे आणायचे असेल, तर पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. सर्वप्रथम पर्यटनस्थळांना जोडणारी ‘रोड कनेक्टिव्हिटी’ मजबूत करून रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करणे आवश्यक आहे. देवगिरी घाटातील कोंडी फोडण्यासाठी पर्यायी बायपास मार्ग आणि प्रशस्त वाहनतळांची निर्मिती व्हायला हवी. यासोबतच, ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनस्थळांच्या आजूबाजूला झालेले अनधिकृत अतिक्रमण कठोरपणे हटवले पाहिजे. अतिक्रमण मुक्त परिसर झाल्यास या ऐतिहासिक वास्तूंना खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता येईल आणि पर्यटकांनाही त्यांचे सौंदर्य सुरक्षित व प्रसन्न वातावरणात अनुभवता येईल. एकंदरीत, छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनाचा वेग झपाट्याने वाढवायचा असेल, तर केवळ कागदी घोषणांवर अवलंबून न राहता कृतीची गरज आहे. सर्वच संबंधित प्रशासकीय विभागांनी आणि प्रामुख्याने पर्यटन विभागाने जुनी कार्यपद्धती बदलून नव्याने कात टाकणे आवश्यक आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय गतिमानता यांची सांगड घातली गेली, तरच पर्यटनाची ही राजधानी खऱ्या अर्थाने पर्यटकांचे स्वागत करण्यास सज्ज होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.