Aurangabad : स्मार्ट सिटीच्या १३ पदे अन् ८०० उमेदवार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad

Aurangabad : स्मार्ट सिटीच्या १३ पदे अन् ८०० उमेदवार!

औरंगाबाद : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या शहर बससेवेसाठी कंत्राटी तत्त्वावर थेट नोकर भरतीच्या मुलाखती मंगळवारी (ता. एक) घेण्यात आल्या. केवळ १३ पदे आणि नोकरी कंत्राटी पद्धतीने असतानाही स्मार्ट सिटी कार्यालयात सकाळपासून बेरोजगार तरुण, तरुणींनी तोबा गर्दी केली. लांबलचक रांगेत थांबून तरुणांनी मुलाखती दिल्या.

स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहर बससेवा चालविली जात आहे. स्मार्ट सिटी पाच वर्षे बससेवा चालविणार असून, पुढील पाच वर्षे ती महापालिकेकडे राहणार आहे. शहर बससाठी चालक व वाहक खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेतले जात आहेत तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला आहे. ही भरती कंत्राटी तत्त्वावर आहे. एक असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन), २ टेक्निकल सुपरवायझर, १ एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर, ९ क्लर्क आणि १८ मेकॅनिक अशा पदासांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

मंगळवारी लिपिक, एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर, टेक्निकल सुपरवायझर आणि असिस्टंट मॅनेजर या १३ पदांसाठी आमखास मैदानाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथील सभागृहात उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. त्यानुसार थेट मुलाखतीसाठी सकाळपासून बेरोजगार तरुण-तरुणींची गर्दी उसळली. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विविध भागांतून उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. सिटीबसचे व्यवस्थापक राम पवनीकर यांच्या उपस्थितीत पथकाने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. रात्री उशिरापर्यंत मुलाखती घेण्याचे काम सुरू होते. सुमारे ८०० बेरोजगारांनी मुलाखतीसाठी हजेरी लावल्याचे सांगण्यात आले.

दिवसभर ताटकळले तरुण, तरुणी

मुलाखतीसाठी सुरवातीला एका टेबलवर कागदपत्र जमा करण्यात येत होते. त्यानंतर मुलाखतीसाठी वेगळा टेबल लावण्यात आला होता. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींचा मुलाखतीसाठी संपूर्ण दिवस खर्ची पडला. एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर या एका पदासाठी तब्बल ९० जणांनी नोंदणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेकॅनिक पदासाठी शुक्रवारी मुलाखती

मंगळवारी १३ पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. १८ मेकॅनिकच्या जागा असून, त्यासाठी शुक्रवारी (ता. चार) थेट मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे स्मार्ट सिटीतर्फे सांगण्यात आले.