
औरंगाबाद : फिडर लाइनवर तब्बल १७०० नळ बेकायदा
औरंगाबाद : शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. पाण्याच्या टाक्या भरत नसल्याच्या कारणांचा शोध घेतला असता, फिडर लाइनवर तब्बल १६०० ते १७०० बेकायदा नळ घेण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार हे नळ तोडले जाणार असून, अशा नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या लाइनवरून कनेक्शन दिले जाणार असल्याचे महापालिकेचे प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
शहरातील पाणीप्रश्नांवर दोन महिन्यांपासून खल सुरू आहे. नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका, जिल्हाप्रशासनासह विभागीय आयुक्तस्तरावर उपाय-योजना सुरू आहेत. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे सुटीवर गेल्यामुळे पदभार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
पदभार मिळताच त्यांनी पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी लक्ष घातले. गुरुवारी सांयकाळी त्यांनी महापालिकेच्या वॉल्व्हमनची बैठक घेतली. या बैठकीत पाण्याच्या टाक्या का भरत नाहीत, याची शहनिशा करण्यासाठी श्री. चव्हाण यांनी चर्चा केली, त्यावेळी पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी असलेल्या फिडर लाइनवर मोठ्या संख्येने बेकायदा नळ घेण्यात आल्यामुळे अडथळे येतात. असे नागरिक जास्तीचे पाणी उचलतात. त्यामुळे टाक्या तासन् तास भरतच नाहीत.
अशा नळ कनेक्शनची संख्या तब्बल १६०० ते १७०० च्या घरात असल्याचे यावेळी समोर आले. त्यामुळे असे नळ तातडीने तोडण्यात यावेत, असे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. हनुमाननगर भागात महापालिकेने गुरुवारी बेकायदा नळ तोडले होते. मात्र नागरिकांनी महापालिकेचे पथक माघारी फिरताच पुन्हा बेकायदा नळ जोडले. याप्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
Web Title: Aurangabad Water Sacrcity 1700 Taps Illegally On Feeder Line
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..