
औरंगाबाद : गोरगरिबांच्या मुलांसाठी भरली घरातच शाळा!
औरंगाबाद : कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील मुलांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या एका शिक्षिकेनेच चक्क स्वतःच्या घरात शाळा भरवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.
कचनेर केंद्रात जिल्हा परीषदेच्या खोडेगाव या शाळेतील शिक्षिका त्रिशला जयकुमार कासलीवाल यांनी विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरु केला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे वर्षभर शाळा भरवता आल्या नाहीत. मुलांशी प्रत्यक्ष संवाद न झाल्याने त्यांचे आतोनात शैक्षणिक नुकसान दिसायला लागले. त्यामुळे ग्रामीण भागातील या लेकरांचे नुकसान भरुन काढण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल, असा विचार त्यांनी केला. शाळेच्या शेवटच्या दिवशी श्रीमती त्रिशला यांनी सर्व पालकांना भेटून उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना स्वतःच्या घरी नेऊन शिकवणार असल्याचे कळवले.
पालकांनीही तातडीने यासाठी संमती दर्शवली. त्रिशला यांच्यावर शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाच्या अध्यापनाची जबाबदारी आहे. तसेच या मुलांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व कासलीवाल कुटूंब घेत आहे. प्रत्येक विषयाचा तज्ज्ञशिक्षक या मुलांचे क्लास घेतो. त्यांच्या या उपक्रमाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, एम. के. देशमुख, उपशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, सोफी लईक, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, व्यंकट कोमटवार, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकुर आदींनी कौतूक केले.
कुटूंबच मुलांचे सेवेत
त्रिशला कासलीवाल यांच्या सासू अंजना लोहाडे अन् आई शकुंतला कासलीवाल या मुलांना संस्कारवर्गाच्या गोष्टी, मुलगा प्रितम, मावशी निता ठोळे हे मुलांना विविध विषयांचे शैक्षणिक धडे देत आहेत. सून पायल या मुलांचा संस्कार वर्ग, योगा, प्रार्थना, हस्तकला, चित्रकला इत्यादी वर्ग घेतात. काकू रुपाली लोहाडे यांनी मुलांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्रिशला यांचे पती प्रवीण लोहाडे हे बोरगाव (ता. गंगापूर) जि.प. शाळेवर मुख्याध्यापक आहेत. ही शिक्षक दांमप्त्य विद्यार्थी हितासाठी सतत पदरमोड करत काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात.
त्रिशला मॅडमवर आमचा पूर्ण विश्वास असून त्या आमच्या लेकरांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतात याची आम्हाला खात्री आहे. मी मुलीला फोन करुन घरी यायचं का? असे विचारल्यावर तिने स्पष्टपणे नकार दिला.
-एक पालक, खोडेगाव.
Web Title: Aurangabad Zilla Parishad Teacher Started Teaching Schools At Own House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..