औरंगजेबाची कबर उखडायचीच असेल तर ती लोकांच्या मनातून उखडा. तेथे (खुलताबादेत) छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. म्हणजे लोक तिथे औरंगजेबाची कबर पाहायला नव्हे तर संभाजी महाराजांचे स्मारक पाहण्यासाठी यायला हवेत, असे मत भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी ‘सकाळ’च्या थेट-भेट उपक्रमात केले.
संजय केणेकर यांची नुकतीच विधान परिषदेवर निवड झाली. त्यानंतर गुरुवारी ‘सकाळ’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. केणेकर म्हणाले, की छत्रपती संभाजीनगर शहराजवळ खुलताबादेत (रत्नपूर) औरंगजेबाची कबर आहे. ही कबर उखडून फेकण्याची मागणी केली जात आहे.
त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, जे पाहण्यासाठी संपूर्ण देशातून लोक तिथे आले पाहिजे, म्हणजेच कबर मनातून उखडून फेकली जाईल. खुलताबादेत संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी आपण जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे मागणी केली आहे. लवकरच ही मागणी मान्य होऊन, पुढील प्रक्रिया सुरू होईल असेही ते म्हणाले.
...तर कुणीही असो त्यांच्या विरोधात उभे राहू
मराठवाड्यातील पाणी प्रश्नाची मला चांगली जाणीव आहे. यामुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासंदर्भात कुणी विरोध किंवा प्रादेशिक असमतोल निर्माण करत असेल तर तो कुणीही असो, अगदी आमच्या पक्षातील असला तरी त्यांच्या विरोधात आपण उभे राहणार असल्याचे देखील आमदार केणेकर म्हणाले.
मराठवाड्याचा पाणी प्रश्न असो किंवा इतर काही विषय याबाबत मराठवाड्यातील आमदार एकत्र येत नसल्याचे बोलले जाते. यावर येथील आमदार, मतदारसंघाच्या बाहेर जात नाही. त्यांची भूमिका मर्यादित असते. परंतु, आपण काही विषयांसाठी, विकासकामांसाठी विरोधी पक्षातील आमदारांसह सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
मित्र पक्षांमध्ये समन्वयाचा थोडासा अभाव
सध्या शहरात शिवसेना (शिंदे गट) भाजपला वरचढ ठरत आहे. शिवाजीनगर भुयारी मार्ग उद्घाटनाचे साधे निमंत्रणसुद्धा भाजपला नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता, कुणी कुणाला वरचढ ठरतेय असे काही नाही. परंतु, आमच्या मित्र पक्षांमध्ये थोडासा समन्वयाचा अभाव निश्चित आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शिंदेंनी दार ठोठावले, की उघडू
मूळ भाजपचे असलेले राजू शिंदे, विधानसभा निवडणुकीदरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले. त्यांनी नुकताच ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. परंतु, भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाला विरोध होत असल्याबाबत त्यांना विचारले. तेव्हा शिंदेंना भाजप प्रवेशासाठी आधी दार तर ठोठावू द्या, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
मी महामंत्री, त्यामुळे छोट्या-मोठ्यात काय?
आमदारकीची संधी दिल्याने स्थानिक पदाधिकारी नाराज झाल्याच्या विषयावर केणेकर म्हणाले, की स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे साफ खोटे आहे. यावेळी अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासह पक्षश्रेष्टीही होते. एक लक्षात घ्या, मी महामंत्री आहे. त्यामुळे काही स्थानिक पदाधिकारी आले काय किंवा नाही आले अशा छोट्या-मोठ्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही.
केणेकरांचा अजेंडा
काही ठिकाणी कंत्राटी कर्मचारी घेण्यास विरोध
पालिकेला परवानगी नाही. त्यामुळे कंत्राटीकरण वाढले
लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या तोकडी
मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न करू
मराठवाडा कृषी विद्यापीठाला ताकद मिळवण्यासाठी प्रयत्नशील
शहराचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवणार
पाणी पुरवठ्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेणार
छत्रपती संभाजीनगरात महापालिका निवडणूक महायुतीतच लढणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.