ऑटोरिक्षासाठी दरवाढ करण्याची मागणी
लातूर ः शेअर ऑटोरिक्षा प्रवासी दरात वाढ मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
येथे पहिली प्रवासी दर वाढ ता. एक ऑगस्ट १९९१ ला झाली होती. दुसरी प्रवासी दर वाढ ता. २५ जुलै २०१२ ला देण्यात आली होती. तेव्हापासून गेल्या १४ वर्षांपासून प्रवासी दरात वाढ देण्यात आलेली नाही. वाढती महागाई, इंधन दरवाढ, स्पेअर पार्ट दरात वाढ, ऑटोरिक्षाच्या किंमतीमध्ये दर वाढ, इन्शुरन्स दर वाढ, विविध शासकीय शुल्कातील दर वाढ यामुळे ऑटोरिक्षा चालकांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. संघटनेच्या वतीने २०२२ पासून पाच वेळा निवेदने देऊनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सोलापूरच्या धर्तीवर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये व पुढील प्रत्येक एका किलोमीटरसाठी २० रुपये प्रमाणे वाढीव प्रवासी दरास मान्यता द्यावी. त्याच प्रमाणात मिटर कॅलिब्रेशन न करता टेरिफ ठरवून अंतरनिहाय शेअर रिक्षा (भागीदारी पद्धतीने) प्रवासी दर वाढीस मान्यता देण्यात यावी, रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मंजूर दिलेल्या दरापेक्षा दीडपट जास्त प्रवासी भाडे वाढीस मंजुरी देण्यात यावी, आदी मागण्या या संघटनेच्या आहेत. या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक गुरूनाथ स्वामी, बंडुसिंग गुलाबसिंग भाट, विनोद मोरे, हनुमंत नारायण पडवळ, सचिन अण्णाराव मळगे यांनी केले आहे.
---