पार्किंग, रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि शहराच्या विस्ताराचे नियोजन होणे आवश्यक
.....
(मुख्य इंट्रो)
धूत मोटर्सचे संचालक मनीष धूत यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगरात गेल्या सहा दशकांपासून ऑटोमोबाइल व्यवसायात आहे. मनीष धूत यांनी १९९१ मध्ये आपले शिक्षण पूर्ण होताच वडिलांच्या व्यवसायात प्रवेश केला. धूत कुटुंबाने ऑटोमोबाइल क्षेत्रातील अनेक टप्पे पाहिले. बजाजपासून सुरवात झाल्यानंतर त्यांनी हुंदाई, होंडा, फोक्सवॅगन अशा विविध ब्रँडसोबत काम केले. सध्या त्यांच्याकडे एमजीची डीलरशिप असून छत्रपती संभाजीनगरसह नांदेड आणि लातूर येथेही मनीष धूत यांचा व्यवसाय विस्तारला आहे. या प्रवासात मनीष धूत यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी आणि बाजारपेठेतील स्पर्धा यांचा वेध घेत व्यवसायाला नवी दिशा दिली. त्यामुळे त्यांचा व्यवसाय आज यशाच्या शिखरावर आहे.
.....................
(सेकंड इंट्रो)
‘शेंद्रा आणि बिडकीनमुळे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक मोठे उद्योग येत आहेत. त्यानिमित्त बाहेरून किमान एक लाख कुटुंबे नजीकच्या काळात शहरात येतील. वाहनांची संख्याही त्याच प्रमाणात वाढणार आहे. आगामी पाच वर्षांत किमान दीड लाख दुचाकी आणि सुमारे ३० हजार चारचाकी वाहनांची भर पडू शकते. त्यामुळे आजपासूनच पार्किंग, रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि शहराच्या विस्ताराचे नियोजन करणे आवश्यक आहे’, असे मत धूत मोटर्सचे संचालक मनीष धूत यांनी व्यक्त केले. दरम्यान, काळानुसार बदल स्वीकारत नवनवीन वाहन कंपन्यांसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याची परंपरा धूत कुटुंबांनी जपली आहे.
मनीष धूत यांनी छत्रपती संंभाजीनगर शहरातील वाहन बाजारपेठ, ग्राहकांचा बदलता कल, भविष्यातील चित्र, त्या अनुषंगाने अपेक्षित सुधारणा यावर आपली भूमिका मांडली. धूत म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजीनगरमधील वाहन बाजारात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली. वर्ष २०२४ मध्ये शहरात सुमारे १० हजार चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. वर्ष २०२५ मध्ये हा आकडा सुमारे १३ हजार २०० पर्यंत गेला, तर २०२६ मध्ये जुलैपर्यंत सुमारे ९ हजार ७०० चारचाकींची विक्री झाली आहे. यंदा वाहन विक्री आणखी वाढेल. वाहन बाजारपेठेच्या वाढीच्या गतीचा विचार केला तर पुढील पाच वर्षांत शहरातील ऑटोमोबाइल बाजारपेठेची वाढ १०० टक्क्यांहून अधिक असेल.’’
ग्राहकांची मानसिकता बदलली
चारचाकी वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे सांगताना धूत म्हणाले, ‘‘पूर्वी घरातील प्रमुख व्यक्ती कारची निवड करायची. आता कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा निर्णयावर प्रभाव असतो. आता कार निवडताना आधी मुलाची पसंती, त्यानंतर पत्नीची पसंती आणि शेवटी कदाचित घरातील पुरुषाची पसंती येते. कोविडनंतर ग्राहकांच्या खर्च करण्याच्या मानसिकतेत बदल झाला आहे. पूर्वी भविष्यासाठी बचत करण्यावर भर असायचा. आता ‘आजचा दिवस जगूया’ असा दृष्टिकोन वाढल्याने खर्च करण्याची वृत्तीही वाढत आहे. त्याचा परिणाम वाहन, पर्यटन, हॉटेल आणि इतर सेवा क्षेत्रांतील खर्चावर दिसत आहे. उत्पन्नाबरोबर खर्च करण्याची क्षमता आणि वाहनांसाठी कर्ज घेण्याची सहजता वाढल्याने महागड्या वाहनांची मागणीही टिकून आहे.’’
अधिक फीचर्स असलेल्या वाहनांना मागणी
‘‘सर्वांत स्वस्त बेस मॉडेलची विक्री तुलनेने कमी असते. ग्राहक शोरूममध्ये आल्यानंतर अधिक फीचर्स असलेल्या मॉडेलकडे वळतो. चारचाकी घ्यायचीच आहे, तर थोडे अधिक पैसे देऊन चांगले फीचर्स असलेले मॉडेल घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. जाहिरातीतील बेस मॉडेल ग्राहकाला शोरूममध्ये आणण्यासाठी असते. प्रत्यक्ष विक्रीत वरच्या मॉडेलला अधिक मागणी असते. एक काळ हॅचबॅक म्हणजे छोट्या आकाराच्या मोटारींचा होता. त्यानंतर सेडान, एसयूव्ही, निओ एसयूव्ही, मायक्रो एसयूव्ही यांनी बाजारपेठेत स्थान मिळवले’’, असेही त्यांनी सांगितले.
‘ईव्ही’मुळे विक्रीनंतरच्या सेवांचे गणित बदलले
वाहन बाजारपेठेचे गणित सांगताना धूत म्हणाले, ‘‘ऑटोमोबाइल डीलरच्या व्यवसायात वाहन विक्रीपेक्षा सर्व्हिस आणि विक्रीनंतरच्या सेवांमधून मोठा महसूल मिळतो. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे हे गणित बदलत आहे. इलेक्ट्रिक वाहनात पारंपरिक इंजिन, गिअरबॉक्स, इंजिन ऑइल आणि अनेक ल्युब्रिकंट्स नसतात. त्यामुळे पारंपरिक सर्व्हिसिंगमधील उत्पन्न कमी होईल. ‘एडीएएस’सारख्या तंत्रज्ञानामुळे अपघात कमी होत आहेत, तर त्याचा परिणाम डेंटिंग-पेंटिंगच्या कामावरही होत आहे. भविष्यात चार्जिंग स्टेशन, बॅटरी रिप्लेसमेंट आणि नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित सेवा ही व्यवसायाची प्रमुख क्षेत्रे ठरतील’’, असे त्यांनी स्पष्ट केले.
आजसोबतच उद्याचा विचार व्हावा
शहरात सध्या असलेली वाहने आणि भविष्यात त्यात होणारी वाढ यासोबत पायाभूत सुविधांच्या आव्हानांचाही आतापासूनच मुकाबला करण्याची गरज धूत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘वाहनांची संख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न गंभीर होत आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर दोन्ही बाजूंना वाहने उभी असतात. प्रत्यक्ष वाहतुकीसाठी एकच लेन उरते. आज आपण १५ मिनिटांत पोचतो; नियोजन केले नाही तर उद्या त्याच अंतरासाठी एक तास लागू शकतो. पुढील काही दशकांचा विचार करून शहराचे नियोजन करण्याची गरज आहे. स्वतंत्र आणि सक्षम नियोजन प्राधिकरणाने शहराच्या विस्ताराचा आराखडा आताच तयार करायला हवा. आजची गरज भागवण्याबरोबरच उद्याच्या शहराचा विचार करणे आवश्यक आहे. वाहने वाढतील, उद्योग वाढतील, लोकसंख्या वाढेल. पण, त्यासाठी रस्ते, पार्किंग, शिक्षण, मनुष्यबळ आणि नियोजनाची व्यवस्था आजपासून करायला हवी.’’
भविष्य हायब्रिड तंत्रज्ञानाचे
वाहन व्यवसायातील बदलत्या तंत्रज्ञानाबाबत धूत म्हणाले, ‘‘पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड असे तंत्रज्ञान बदलत आहे. भविष्यात इलेक्ट्रिकसोबत हायब्रीड तंत्रज्ञानही महत्त्वाचे ठरेल. इलेक्ट्रिकवर ठरावीक अंतर प्रवास करून बॅटरी संपल्यानंतर इंजिनवर आणि पुढे चार्जिंगनंतर पुन्हा इलेक्ट्रिकवर जाणारे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी उपयुक्त ठरू शकते’’, असे त्यांनी सांगितले. सेकंड-हँड वाहनांच्या बाजारपेठेबाबत धूत म्हणाले, ‘‘नवीन वाहनांबरोबरच सेकंड-हँड वाहनांचा बाजारही वेगाने वाढत आहे. नवीन कार घेतल्यानंतर काही वर्षांत तिच्या किमतीत मोठी घसरण होते. त्यामुळे तुलनेने चांगल्या स्थितीतील वाहन कमी किमतीत घेण्याचा पर्याय ग्राहक स्वीकारत आहेत. नवीन कार घेण्याची क्षमता नसलेल्या ग्राहकांसाठी वापरलेली कार हा चांगला पर्याय आहे. हा बाजार दिवसेंदिवस मोठा होत आहे.’’
..........
दीर्घकालीन नियोजनाची गरज
छत्रपती संभाजीनगर शहराच्या विस्तारासाठी दीर्घकालीन नियोजनाची गरज असल्याचे मनीष धूत यांनी स्पष्ट केले. हैदराबादच्या धर्तीवर शहराभोवती नियोजित वर्तुळे, लिंकिंग रोड आणि विकासाचे टप्पे निश्चित करता येतील, अशी कल्पना त्यांनी मांडली. दरम्यान, वाळूज ते शेंद्रा या दिशेने प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान पर्यायी मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे. “एकाच रस्त्यावर संपूर्ण वाहतूक अवलंबून राहिली तर काम सुरू असताना शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू शकते”, असेही त्यांनी नमूद केले.