लातुरातील ३०० हून अधिक विद्यार्थी
‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेत सहभागी
-----
लातूर, ता. ८ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राच्या वतीने लातूर जिल्हास्तरीय ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेचे आयोजन ९ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांमधील ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून, विद्यार्थी आपल्या नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांचे पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण करणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, नावीन्यपूर्ण व सर्जनशील कल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. मनोहर चासकर राहणार आहेत. कार्यक्रमास नवोपक्रम, इनक्युबेशन व लिंकेजेस विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाधेर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे कार्यक्रम संचालक डॉ. नागोबा शिवप्पा एन., जिल्हा आविष्कार समन्वयक डॉ. प्रमोद पाटील हे स्पर्धेचे समन्वयक म्हणून कार्य पाहत आहेत. ‘आविष्कार’ संशोधन स्पर्धेमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माण व वैद्यकीय क्षेत्र, कृषी व पशुसंवर्धन, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, मानव्यविद्या, भाषा व ललित कला आदी विविध ज्ञानशाखांतील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. लातूर जिल्ह्यातील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ही या स्पर्धेची विशेष बाब आहे.
-----