रामलल्लांच्या दर्शनासाठी आता थेट गावातून लालपरी
--------------------
-एसटी महामंडळाची विशेष सुविधा; काशी-प्रयागराजसह ज्योतिर्लिंग दर्शनाचीही संधी
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १५ ः अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची इच्छा असलेल्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेचे आरक्षण मिळविण्याची चिंता आणि प्रवासातील अडचणी बाजूला ठेवत आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) माध्यमातून थेट गावातून अयोध्येपर्यंत प्रवास करता येणार आहे.
महामंडळाने प्रासंगिक करारांतर्गत विशेष बससेवा उपलब्ध करून दिली असून, भाविकांचा किमान ४० जणांचा ग्रुप तयार झाल्यास एसटी बस थेट संबंधित गावात येऊन भाविकांना अयोध्येच्या यात्रेसाठी घेऊन जाणार आहे. या सुविधेमुळे कुटुंबीय, मित्रमंडळी, भजनी मंडळे, महिला बचत गट आणि धार्मिक संस्थांना एकत्रितपणे तीर्थयात्रेचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येसोबतच परिसरातील अन्य धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याची संधीही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अयोध्या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून बसच्या प्रकारानुसार किलोमीटरच्या आधारे भाडे आकारले जाते. बसने प्रत्यक्ष किती अंतर पार केले, याची नोंद स्पीडोमीटरद्वारे केली जाते. त्यानुसार अंतिम बिल तयार केले जाते. बस आरक्षित करताना एकूण अंदाजित रकमेच्या २० टक्के रक्कम आगाऊ जमा करावी लागते. प्रवासाचा मार्ग, अंतर आणि बसचा प्रकार यानुसार अंतिम खर्च निश्चित होतो. प्रवाशांच्या संख्येनुसार बसची निवड करता येते. साध्या लालपरी बससाठी किमान ४० प्रवाशांचा ग्रुप आवश्यक आहे, तर स्लीपर बससाठी ३० प्रवाशांची अट आहे. ग्रुप तयार झाल्यानंतर स्थानक प्रमुख कार्यालयात संपर्क साधून बस आरक्षित करता येते. प्रवाशांच्या मागणीनुसार इतर राज्यांतील तीर्थक्षेत्रांसाठीही विशेष बससेवेची सुविधा उपलब्ध आहे. केवळ अयोध्येपुरतीच ही सुविधा मर्यादित नसून, भाविकांना काशी विश्वनाथ, प्रयागराज तसेच सहा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठीही विशेष पॅकेज टूरचे नियोजन करता येते. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे प्रवासाचा मार्ग आणि दर्शनस्थळे निश्चित करता येतात. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला एसटीच्या माध्यमातून नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
---
दहा लाखांचा विमा; परमिटचीही जबाबदारी
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत या विशेष प्रवासासाठी प्रतिप्रवासी दहा लाख रुपयांचा विमा काढण्याची सुविधा असल्याची माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यांचे आवश्यक परमिट महामंडळाकडून काढून दिले जाते. मात्र, प्रवासादरम्यान लागणारा टोल, पार्किंग शुल्क आणि लागू असलेले कर यांचा खर्च प्रवासी ग्रुपला करावा लागतो. निवास आणि भोजनाची व्यवस्था प्रवाशांनी स्वतःच्या खर्चाने करायची आहे.
---
महिला-ज्येष्ठांना सवलत मिळणार का?
महिला सन्मान योजनेंतर्गत एसटीच्या नियमित प्रवास भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात येते. ज्येष्ठांसाठी वयानुसार ५० टक्के किंवा शंभर टक्के सवलतीची तरतूद आहे. मात्र, अयोध्येसारख्या आंतरराज्यीय प्रवासासाठी किलोमीटरनुसार भाडे आकारल्या जाणाऱ्या प्रासंगिक कराराच्या विशेष बससेवेत या सवलतींची अंमलबजावणी कशी होणार, याबाबत आगाराकडून स्पष्टता मिळालेली नाही.
विशेषतः महिला सन्मान योजनेची सवलत महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच लागू असल्याने उत्तर प्रदेशातील प्रवासासाठी ती लागू होत नाही असे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.