‘शासकीय आयुर्वेद’च्या प्रवेश क्षमतेत वाढ
नियमित जागा ५० वरून ६० वर, प्रवर्गासह ७५ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
.......
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १६ : येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमाची नियमित प्रवेश क्षमता ५० वरून ६० करण्यात आली असून, विविध प्रवर्गासह ही एकूण प्रवेश क्षमता आता ७५ वर पोचली आहे. या प्रवेश क्षमतावाढीस नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोग (एनसीआयएसएम) कडून अधिकृत मान्यता मिळाली असून, त्यासंदर्भातील परवानगीपत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.
या निर्णयामुळे धाराशिवसह राज्यातील आयुर्वेद शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन व अधिक संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश क्षमतावाढ महत्त्वाची ठरणार आहे. आयुष विभागाचे संचालक डॉ. रमण घुंगराळेकर आणि महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील यांनी त्यासाठी प्रयत्न केले असून, त्यास यश प्राप्त झाले आहे.
आयुर्वेद शिक्षणाला मिळणार बळ
प्रवेश क्षमतेत झालेल्या वाढीमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना शासकीय महाविद्यालयात पदवी शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून, यामुळे भविष्यात आरोग्य क्षेत्रास प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
.......
((कोट))
राष्ट्रीय भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे महाविद्यालयाच्या उच्च शैक्षणिक प्रगतीची पावती आहे. यामुळे आयुर्वेद शिक्षणाच्या क्षेत्रात धाराशिवचे स्थान अधिक बळकट होणार आहे.
- डॉ. वीणा पाटील, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव