बाबासाहेबांचे विचार पुढच्या
पिढीला देणे गरजेचे : चौगुले
-----
धाराशिव, ता. ३१ : ‘शिक्षणाशिवाय माणसाच्या आयुष्यात परिवर्तन होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशाला उत्कृष्ट राज्यघटना दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकर हेच आपले आयडॉल असले पाहिजेत. पुढच्या पिढीला काही द्यायचे असेल, तर बाबासाहेबांचे विचार देणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक तगर भूमी येथे आयोजित वर्षावास महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरी यांच्यासह विविध भिक्खूंची उपस्थिती होती. चौगुले म्हणाले, तगर भूमीच्या विकासासाठी योग्य नियोजन करून पुढील चार-पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने विकासकामे केली जातील. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगराचा अडथळा दूर करण्याकरिता स्वतः पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमात भंते सुमेधजी नागसेन, भंते महाविरो थेरो, भंते अश्वजित, भंते बुद्धघोष काळेगावकर आणि भंते कमल धम्म यांनी धम्मदेसना दिली. जिल्हा परिषद सभापती पूजा शिंदे, पोपटराव सोनटक्के, राजाभाऊ ओव्हाळ, कैलास शिंदे, अनिल हजारे उपस्थित होते.