बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण
हिंगोली, ता. १३ (बातमीदार) : शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागातील जिल्हा क्रीडा संकुलात २७ व २८ फेब्रुवारी २०२७ ला बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (ता. १३) कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण केले.
जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी, बॅडमिंटन खेळाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी आणि तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, या उद्देशाने अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ व २८ फेब्रुवारी २०२७ रोजी लिंबाळा (मक्ता) भागातील जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये विविध गटांमध्ये सामने आयोजित करण्यात येणार असून, विजेत्या खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके आणि प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत देशभरातून नामवंत खेळाडू हजेरी लावणार आहेत. स्पर्धेच्या लोगोचे अनावरण आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजितराज खुराणा, सेवानिवतृत्त अभियंता अशोक अग्रवाल, सुरेश सराफ, सुनील देवडा, मनोज आखरे, जीतसिंग साहू, डाॅ. शिवाजी गिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अशोक अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचलन दीपक नयनवाणी यांनी केले तर आभार सुमित चौधरी यांनी आभार मानले.