महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य; आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिल हरी अडागळे (४३, रा. सातारा परिसर) याचा नियमित जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.ए. लवंद-कोकाटे यांनी फेटाळला. तपासातील महत्त्वाचे मुद्दे अद्याप प्रलंबित असून, या टप्प्यावर आरोपीला जामीन दिल्यास तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सामाजिक कार्यकर्ते मनोज वाहुळ यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने फोनवरील संभाषणात महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या संभाषणाची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या. या प्रकरणात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २२ ऑक्टोबर रोजी आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सहायक सरकारी वकील सविता हिवराळे यांनी आणि, फिर्यादीच्या वतीने ॲड. पद्मभूषण परतवाघ यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला. आरोपीच्या कृत्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, तपास अद्याप निर्णायक टप्प्यावर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आक्षेपार्ह क्लिपशी संबंधित इन्स्टाग्राम आयडीची मालकी शोधणे बाकी आहे. तसेच आरोपीचे मुंबईतील मानखुर्द येथील रवींद्र काळखैरे याच्याशी संभाषण झाल्याचे तपासात समोर आले असून, त्याचा शोध घेऊन दोघांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असल्याने आरोपीचा जामीन नामंजूर करण्याची विनंती करण्यात आली.