Bail Pola : पोळ्याला दिला जातो वळूसह मातीच्या बैलाला मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bail Pola 2022

Bail Pola : पोळ्याला दिला जातो वळूसह मातीच्या बैलाला मान

पाचोड : पोळ्याच्या दिवशी गावच्या वेशीतून बैल सर्वप्रथम आपला नेण्यासाठी काही गावांत बोली लागते तर काही ठिकाणी मानासाठी वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्याची उदाहरणे आहे. मात्र, थेरगाव (ता.पैठण जि.औरंगाबाद) येथे पोळ्याच्या दिवशी चक्क वेशीतून सर्वप्रथम जाण्याचा मान वळूला दिला जातो. अन् वळू नसेल तर मातीचा बैल बनवून गावकरी त्याला वेशीतून नेवून पोळा सण साजरा करीत असून मानाच्या बैलावरून गावात वाद, विवाद होत नसल्याने ग्रामस्थांनी ६० वर्षांपासून ही परंपरा जपली आहे.

थेरगावची लोकसंख्या पावणेचार हजाराच्या जवळपास असून साठ वर्षांपूर्वी वेशीतून पहिल्यांदा बैल काढण्याचा मान कधी हिंदू तर कधी मुस्लिम घराणेशाहीकडे होता. परंतु ज्यांनी वेशीतून पहिल्यांदा बैल काढण्याचा मान घेतला त्याच्या दावणीला बैल राहिले नाहीत. त्याच्या नशिबी दारिद्र्य येत असल्याची ग्रामस्थांची धारणा आहे. त्यामुळे साठ वर्षांपूर्वी गावातील वजनदार म्हणून ओळखले जाणारे कै.भाऊराव निर्मळ, पै.मन्नुखॉ पटेल, कै.एकनाथ लबडे आदींनी गावात ग्रामदेवतेला नवसापोटी सोडलेल्या वळूला वेशीतून सर्वप्रथम जाण्याचा मान दिला. तीच परंपरा साठ वर्षांनंतर अखंडितपणे कायम असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पोळ्याच्या दिवशी येथे पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर वेशीला दुतर्फा बांधलेले तोरण वळूला पुढे करून ते तोडल्यानंतर पोळा फुटल्याचे जाहीर केले जाते. गावांत वळू नसेल तर मातीच्या बैलांना तोरणापलीकडे टाकून मान दिला जातो. यावेळी शेतगड्यावर बैलाची जबाबदारी सोपविणारा मालक आपले बैल वेशीतून आधी जाऊ नये म्हणून वेशीजवळच तटस्थ उभे असतात.

वाद होण्याचा प्रश्नच नाही

सर्वप्रथम पूजेसाठी पोळ्याच्या दिवशी बैलाची मिरवणूक काढून वेशीतून मान घेण्याची परंपरा जुनी असली तरी ज्यांनी कुणी सणाला आपला बैल प्रथम वेशीतून नेऊन मान घेतला, त्याच्या दावणीला बैल राहत नसल्याची ग्रामस्थांमध्ये धारणा आहे. शिवाय मानापमानात वादाचे प्रसंग घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे गत साठ वर्षांपासून पोळ्याचा मान ग्रामदेवतेला नवसापोटी सोडलेल्या वळूलाच दिला जातो. वळू नसेल तर मातीच्या बैलाला मान दिला जातो.

प्रत्येक जण वळूला वेशीतून पुढे कसा जाईल याची काळजी घेतात. आजपर्यंत गावात मानपानावरून शांतता व एकात्मतेला कधी गालबोट लागले नाही. गत पाच पिढ्यांपासून वळूलाच मान दिला जातो."

-मीनाताई रोडगे, सरपंच, थेरगाव

पोळा सणाला बैल प्रथमतः वेशीतून नेऊन मान घेतला. त्याच्या दावणीला बैल राहत नसल्याच्या धारणेने वेशीतून प्रथम जाण्यास कुणी धजावत नाही. त्यामुळे गत साठ वर्षांपासून पोळ्याला वेशीतून जाण्याचा मान वळूला दिला जातो.

- ईश्वर औटी, पोलिस पाटील

Web Title: Bail Pola 2022 Festival Thergaon Tradition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..