बजाजनगरात उभारणार शिवरायांचे भव्य स्मारक?
--
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : झपाट्याने विस्तारत असलेल्या वडगाव (कोल्हाटी) बजाजनगर परिसराला आता भव्य शिवस्मारक आणि सुसज्ज सार्वजनिक उद्यानाची प्रतीक्षा आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक विरंगुळ्याच्या ठिकाणांचा अभाव लक्षात घेता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वाळूज रहिवासी क्षेत्रातील ओएस-८७ भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, शिवबालोद्यान आणि सार्वजनिक उद्यान विकसित करावे, अशी मागणी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सचिन गरड यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले. वडगाव (को.)-बजाजनगर परिसरात औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासोबतच नागरीकरणाचा वेग वाढत आहे. परिणामी, लोकसंख्येतही भर पडत असून, नागरिकांना मोकळ्या जागा, उद्याने आणि विरंगुळ्यासाठी सार्वजनिक ठिकाणांची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन संबंधित भूखंड शिवस्मारक आणि उद्यानासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्याची मागणी गरड यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, लोककल्याणकारी विचार नव्या पिढीपर्यंत पोचावेत, या उद्देशाने येथे हे शिवस्मारक उभारावे. सोबतच मुलांसाठी खेळण्याची साधने, महिलांसाठी सुविधा, ज्येष्ठांसाठी बैठक व्यवस्था, पादचारी मार्ग, वृक्षारोपण, विद्युत रोषणाई अशा सुविधांनी युक्त उद्यान विकसित करावे, असे निवेदनात नमूद केले आहे.
----
भूखंडाच्या संरक्षणाला प्राधान्य
प्रस्तावित भूखंडाचा अनधिकृत वापर अथवा अतिक्रमण होऊ नये, यासाठी तातडीने संरक्षण भिंत बांधावी. तसेच शिवस्मारक व उद्यानासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी सचिन गरड यांनी केली आहे.