आत्महत्या नाही, नव्या आशेची वाट बळिराजाला हवी प्रशासनाची साथ

आत्महत्या नाही, नव्या आशेची वाट
बळिराजाला हवी प्रशासनाची साथ
Published on: 
आत्महत्या नाही, नव्या आशेची वाट बळिराजाला हवी प्रशासनाची साथ ---- धाराशिव तहसीलचे ‘बळिराजा नवचेतना अभियान’ ठरणार आशेचा किरण ----- सकाळ वृत्तसेवा ः धाराशिव, ता. १८ : बळिराजाचे वाढते नैराश्य आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी धाराशिव तहसील कार्यालयाने एक संवेदनशील, सर्वसमावेशक आणि अभिनव पाऊल उचलले आहे. ‘‘बळीराजा नवचेतना अभियान-शेतकऱ्याच्या सोबत प्रशासन’’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ शासकीय योजनांची कागदोपत्री माहिती देणे हा नसून, संकटात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत थेट पोचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि समस्येचे अंतिम निराकरण होईपर्यंत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे हा आहे. ग्रामस्तरीय गृहभेट व पथक साधतेय अनौपचारिक संवाद प्रत्येक गावात महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहायक, आशा व अंगणवाडी सेविका, महसूलसेवक तसेच स्थानिक युवक-युवतींचे विशेष ‘गृहभेट पथक’ तयार करण्यात आले आहे. हे पथक कर्जबाजारीपणा, पीक नुकसान किंवा तीव्र मानसिक तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत आहे. ---- एक खिडकी शेतकरी मदत केंद्र व नियंत्रण कक्ष तहसील कार्यालयात ‘तालुका दुष्काळ निवारण उपाययोजना समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे पाणीसाठा, चारा उपलब्धता, टँकर अधिग्रहण, पीकविमा, कर्जमुक्ती आणि सावकारी तगाद्याच्या तक्रारींची तत्पर नोंद घेऊन योग्य तो समन्वय साधला जात आहे. ---- १० कलमी ग्रामस्तरीय कृती आराखडा गावोगावी स्थापन होणाऱ्या ग्रामस्तरीय समितीमार्फत दुष्काळी अनुदान, पिके व विमा, मुलांचे शिक्षण, रेशन धान्य, बँक कर्जवसुली, शासकीय योजना (संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, लाडकी बहीण इ.), जनावरांचा चारा आणि आरोग्यविषयक समस्यांचा सखोल आढावा घेऊन प्रत्यक्ष मदत पोचविण्यात येणार आहे. ----- प्रबोधन, मानसोपचार व आत्मविश्वासाचा आधार केवळ आर्थिक व अन्नधान्याची मदत नव्हे, तर शेतकऱ्यांचे खचलेले मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक गावात विशेष प्रबोधन सत्रे आयोजित केली जात आहेत. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती मार्गदर्शक, कीर्तनकार आणि पथनाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जगण्याची नवी उमेद दिली जात आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मार्गदर्शनाद्वारे इतरांना धीर देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ---- ((कोट)) शेतकऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधा, आगामी संकट ओळखा, आवश्यक ती तातडीची मदत द्या आणि समस्येचे समूळ निराकरण होईपर्यंत पाठपुरावा करा. दुष्काळासंदर्भात केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दुष्काळ निवारणासाठी आणि त्यास समर्थपणे तोंड देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण दुष्काळ निवारण आराखडा बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. - डॉ. मृणाल जाधव, तहसीलदार, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com