बँकिंगचे नियम पाळा, फसवणूक टाळा
लिंक, कॉल, एसएमएसपासून सावध राहा, आरबीआयकडून ग्राहकांना सतर्कतेचा इशारा
छत्रपती संभाजीनगर ः तुमचे केवायसी अपडेट करा, अन्यथा तुमचे बँक खाते ब्लॉक केले जाईल, केवायसीची मुदत संपली आहे, खाते सुरू ठेवण्यासाठी तातडीने माहिती अपडेट करा, अशा वेगवेगळ्या पद्धती वापरून सायबर भामटे नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करत आहेत. त्यामुळे संशयास्पद लिंक, कॉल आणि संदेशांपासून सावध राहा, बँकिंगचे नियम पाळा, फसवणूक टाळा असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने केले.
बँक किंवा एनबीएफसीचे अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना संदेश पाठवले जातात. त्यामध्ये केवायसी अपडेट करण्यासाठी लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकाकडून बँक खाते क्रमांक, कार्डची माहिती, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड, यूपीआय पिन किंवा ओटीपी यांसारखी गोपनीय माहिती मागितली जाते. ही माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच खात्यातील रक्कम परस्पर वळती केली जाते.
-----
घाबरू नका, आधी खात्री करा
केवायसीच्या नावाने आलेला संदेश पाहून ग्राहकांनी घाईघाईने कोणतीही कृती करू नये. खाते बंद होईल, दंड आकारला जाईल किंवा सेवा तत्काळ बंद होईल अशा शब्दांचा वापर करून फसवणूक करणारे ग्राहकांवर मानसिक दबाव आणतात. त्यामुळे अशा संदेशांना प्रतिसाद देण्यापूर्वी संबंधित बँकेशी थेट संपर्क साधून खात्री करणे आवश्यक आहे.
-------------------
तीन नियम पाळा, फसवणूक टाळा
१) कुठल्याही लिंकवर घाईघाईने क्लिक करू नका.
२) केवायसीच्या नावाने आलेल्या अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नका.
३) ओटीपी, यूपीआय पिन, एटीएम पिन, पासवर्ड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे नंबर किंवा बँकिंगची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका.
----
लिंकवर क्लिक केल्यानंतर काय होते?
सायबर भामटे भीती दाखवून ग्राहकाला पुढील प्रक्रियेसाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. लिंक उघडल्यानंतर बँकेसारखी दिसणारी बनावट वेबसाइट किंवा ॲप समोर येते. त्यावर ग्राहकाकडून खाते क्रमांक, डेबिट कार्डची माहिती, पॅन, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक अशी अन्य माहिती भरून घेतली जाते. त्यानंतर भामटे खात्यातून पैसे काढतात. त्यासाठी कोणतीही माहिती भरू नका.
----------------
ॲप डाउनलोड करणे टळावे
काही वेळा केवायसी अपडेट करण्यासाठी एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अशा ॲपच्या माध्यमातून मोबाइलवरील माहिती किंवा स्क्रीनवरील हालचाली पाहण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने सांगितलेले ॲप डाउनलोड करणे टाळावे.
------------------------
स्क्रीन शेअरिंगचा गंडा
तुमची केवायसी प्रक्रिया आम्ही करून देतो, असे सांगून ग्राहकाला स्क्रीन शेअर करण्यास किंवा रिमोट ॲक्सेस देण्यास प्रवृत्त केले जाते. त्यानंतर ग्राहक मोबाइलवर बँकिंग किंवा यूपीआय ॲप उघडतो. स्क्रीनवर दिसणारी माहिती, व्यवहाराची प्रक्रिया किंवा मोबाइलवर येणारे संदेश सायबर भामट्यांना दिसतात. त्यावरून ते थेट ग्राहकांच्या खात्यातून पैसे वळते करून घेतात.
-------
ओटीपी दिला आणि पैसे गेले
केवायसीसाठी आलेला ओटीपी सांगा, व्हेरिफिकेशन करा किंवा एक रुपयाचा व्यवहार करून पाहा, अशा कारणांखाली ग्राहकाकडून संवेदनशील माहिती मिळवली जाऊ शकते. काही वेळा ग्राहकाला स्वतःच यूपीआय पिन टाकण्यास सांगितले जाते. ग्राहकाने ही माहिती दिली किंवा फसवणुकीच्या प्रक्रियेत स्वतः व्यवहाराची मंजुरी दिली, तर त्याच्या खात्यातून पैसे दुसऱ्या खात्यात किंवा यूपीआय व्यवहाराद्वारे वळवले जाऊ शकतात.
---------------------
नकळत होतो व्यवहार
सायबर भामट्यांना मोबाइलवरील बँकिंग माहिती, ओटीपी किंवा व्यवहाराची माहिती मिळाल्यास ते उपलब्ध असलेल्या सुविधांचा गैरवापर करून अनधिकृत व्यवहार करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे फक्त स्क्रीन शेअर केली आहे, पैसे कसे जातील, असा समज धोकादायक ठरू शकतो.
((कोट)))
बँक कोणताही ओटीपी केवायसीसाठी पाठवत नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्याविषयी कुणी विचारताच त्यांना प्रतिसाद देऊ नये. बँक शाखेशी संपर्क साधावा. बँकेकडून कोणतीच एपीके फाइल, लिंक पाठवण्यात येत नाही. तसे झाल्यास लिंक किंवा ती फाइल उघडू नये.
- प्रेषित मोघे, व्यवस्थापक, लीड बँक