Basweshwar Jayanti 2023 : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर!

विविध कालखंडातील धार्मिक-वैचारिक क्रांती ही भारत देशच नाही तर जगाच्या स्थित्यंतरातील झालेल्या सर्वांगीण बदलावर आपली छाप सोडली आहे.
Basweshwar Jayanti 2
Basweshwar Jayanti 2sakal

जगाला सर्वकाळ दिशा देण्याचे महान कार्य भारतीय तत्वज्ञानाने आणि क्रांतिकारी विचारांनी केले आहे. विविध कालखंडातील धार्मिक-वैचारिक क्रांती ही भारत देशच नाही तर जगाच्या स्थित्यंतरातील झालेल्या सर्वांगीण बदलावर आपली छाप सोडली आहे. प्राचीन आणि आधुनिक तत्वज्ञ आणि त्यांच्या कृतीशील तत्वज्ञानाचा मूलगामी प्रभाव भारतीय तत्वज्ञानावर झाला आहे.

भारतीय इतिहासाच्या मध्ययुगीन कालखंडात विविध कृतीशील विचारवंत आणि समाजसुधारक होऊन गेले, त्यापैकीच एक म्हणजे बाराव्या शतकातील थोर क्रांतिकारी, समाजसुधारक महात्मा बसवेश्वर होत! इसवी सनाचे बारावे शतक म्हणजे संपूर्ण समाजाला वर्णव्यवस्थेने घट्ट विळखा घातलेला भयंकर काळ! पूर्व वैदिक काळातील गुण-कर्माच्या आधारे झालेले माणसांचे वर्गीकरण हे उत्तर वैदिक काळात पूर्णतः कट्टर झाले.

'ज्याच्या हाती शिकार तोच शिकारी' या भिकार न्यायाने शांत, गरीब आणि पापभिरू माणूस शुद्र गणला गेला आणि समाजाची संपूर्ण उतरंड कोसळली गेली. सर्वत्र कर्मकांड आणि वर्ण-वंश भेदाने समाज पुरता पोखरला गेला. चार वर्णापैकी स्त्री-शुद्रादिकांना माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क नाकारले गेले. त्यांना गावाबाहेर हाकलले गेले. त्यांना जनावरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली गेली. माणसासारखाच असलेला दुसरा माणूस अस्पृश्य झाला! अशा कठीण-खडतर काळांत शैव ब्राह्मण कुटुंबात महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला.

महात्मा बसवेश्वरांना बालपणात पडलेले प्रश्न सर्वांनाच मोठे अचंबित करून जातात. ते स्वतः शैव ब्राह्मण कुटुंबातील असल्यामुळे त्यांच्या घरी सोवळे-ओवळे आणि इतर कर्मकांडाचे मोठ्या कट्टरतेणे पालन व्हायचे. घरी जर कुणी ब्राम्हणेतर व्यक्ती आला त्याच्यासोबत होणारी देवाण-घेवाण त्यांना अस्वस्थ करायची; आणि मग बसवेश्वर आपली बहिण, वडील आणि आई यांना "आपण यांना का स्पर्श करत नाही? यांना आपण घरात का येऊ देत नाही? यांना आपण दुरून का पाणी देतो?"

असे एक ना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडायचे. याविषयी समाधान झाले नाही की, ते एकटेच विचार करत बसायचे. वयात आल्यावर ब्राम्हण कुलाचाराप्रमाणे तरुणांची मुंज केली जाते. बसवेश्वराची मुंज करण्याचे ठरले तेंव्हा त्यांनी आपल्या नातेवाईक आणि पुरोहितांना 'माझीच मुंज का करायची? ताईची मुंज का करत नाहीत?' असा मुलभूत प्रश्न विचारून सर्वांनाच निरुत्तर केले. "ईश्वर सर्वांवर सारखेच प्रेम करतो.

जन्माने, मुंज करून आणि जाणवे परिधान केल्याने कुणी माणूस श्रेष्ठ-ब्राह्मण होत नसून तो कर्मानेच श्रेष्ठ-ब्राह्मण ठरतो" असे बेडर वचन बोलून कणाप्पा यांनी सांगितलेल्या कथेचा दाखला देत मनाला न पटणाऱ्या संस्कारांना नकार देऊन बसवेश्वरांनी घरातून निघून जायचे ठरवले. ही क्रांतिकारी घटना म्हणजे इसविसनपूर्व पाचव्या शतकांतील बोधिसत्व गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्याशी तंतोतंत मिळती जुळती वाटते.

त्यानंतर बसवेश्वरांनी कुडलसंगमाकडे प्रस्थान केले. तिथे जातवेदमुनीच्या सानिध्यात बारा वर्षे अध्ययन केले. सर्वच अध्यात्म-तत्वज्ञान-विचारधारांचा कुडलसंगम याठिकाणी त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांची वैचारिक-अध्यात्मिक बैठक अत्यंत मजबूत झाली. आपली आगळी-वेगळी भक्ती परंपरा जोपासतांना बसवेश्वर हे भगवान शंकराच्या पिंडीवर फुले वाहून आनंदाने भजन म्हणत खूप नाचायचे! 'भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त' या जगद्गुरू तुकोबांच्या अभंगाप्रमाणे ते भावविभोर होऊन भजन म्हणत नृत्य करायचे!

त्यानंतर जातवेद मुनींनी सांगितलेली "मदर चन्नाप्पा" ची कथा खऱ्या अर्थाने बसवेश्वरांना पूर्णतः बदलून गेली! भगवान शंकरांनी पंचपक्वान्नाच्या नैवेद्याऐवजी मादर म्हणजे बहिष्कृत चन्नपाच्या साध्या परंतु अत्यंत प्रेम-श्रद्धा आणि भक्तिभावाने बनवलेल्या आंबील नैवेद्याचा स्वीकार केला! ही कथा एकूण बसवेश्वरांच्या धर्म आणि ईश्वर याविषयीच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आणि सर्वच माणसे ईश्वराने सारखीच बनवलेली असल्याकारणाने, कुणीही श्रेष्ठ-कनिष्ठ नसून, माणसामाणसामध्ये भेद करणे म्हणजेच ईश्वराचा आणि त्याच्या अद्भुत मनुष्यामात्रांचा अपमान करणे होय याची अनुभूती आली. तिथेच त्यांनी आपले गुरु जातवेद मुनींच्या सल्ल्याने आणि सर्वांगीण विवेकशील विचार करून विवाह केला.

त्यानंतर बसवेश्वरांनी सहा वर्षे मंगळवेढा (पंढरपूर) येथे राहून आपले कार्य करतांना माणसामधला भेद संपुष्टांत आणला. शूद्रातिशूद्र बसवेश्वरांना आपले गुरु मानू लागेल. सर्वच उपेक्षित लोकांना बसवेश्वर आपले वाटायला लागले. "सर्व स्त्री-पुरुष समान असून कुणालाही ईश्वराची पूजा करता येते. इथे कुणी श्रेष्ठ-कनिष्ठ नसून प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे" असे सांगून त्यांनी 'अनुभवमंटप'ची निर्मिती केली. त्यानंतर बसवेश्वरांनी शरण चळवळ सुरु केली. आपल्या शरण चळवळ आणि अनुभवमंटपच्या माध्यमातून त्यांनी गावाबाहेरील लोकांना आपल्यासोबत जोडून घेतले.

माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे. अनाचार, चोरी, द्वेष, मत्सर, क्रोध, राग, स्तुती, आत्मस्तुती या विकारांपासून माणसाने दूर रहावे. या पासून दूर राहणे म्हणजेच खऱ्या मानव धर्माचे पालन करणे होय. हळूहळू सर्वत्र त्यांच्या कार्याची ओळख होऊन लोक त्यांना महात्मा, बसवण्णा संबोधून अल्पावधीतच शरण चळवळ लोकचळवळ झाली. महात्मा बसवेश्वरांचे "मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्टेने अपवित्र होण्यापेक्षा मला शरणांच्या पायातील पादुका करा, कूडलसंगमदेवा!" हे वचन सुप्रसिद्ध झाले.

आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांची देशाला नितांत गरज आहे. सर्वत्र विविध रंगांचे, जात-धर्म-पंथांचे विवेकशून्य भडक स्तोम माजले आहे. माणूस माणसापासून दूर जात आहे. आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे(?) हे सांगतांना इतर धर्माच्या तत्वांची पायमल्ली होता कामा नये. आज महात्मा बसवेश्वरांच्या विचारांवर आपण सर्वांनी चालणे क्रमप्राप्त आहे. माणूस केंद्रस्थानी ठेऊन मानवधर्माचे आचरण करणे अपेक्षित आहे. माणूस अंतर्बाह्य शुद्ध झाला पाहिजे! त्याचे चित्त निर्मळ असून व्यवहार सुद्धा शुद्धच असला पाहिजे!

देवलोक मृत्युलोक वेगळा नाही।

सत्यवचन बोलणे म्हणजे देवलोक।

असत्यवचन म्हणजेच मृत्युलोक।

सदाचार स्वर्ग, अनाचार नरक आहे।

आपणच प्रमाण आहोत, कूडलसंगमदेवा!

हे महात्मा बसवेश्वरांचे अत्यंत महत्वपूर्ण वचन असून यानुसार आज प्रत्येक व्यक्तीने आपापल्या धर्म-नीती-तत्वाचे पालन केले पाहिजे. आज महात्मा बसवेश्वर जयंतीबरोबरच मुस्लीम धर्माचा पवित्र सण रमजान ईद, अक्षय तृतीया सारखा मुहूर्त आणि श्री परशुराम जयंती आदिसारख्या चार गोष्टी एकाच दिवशी आल्यामुळे सर्व धर्मीयांनी एकमेकांच्या महान मुल्ये, तत्वांचा सन्मान करून एकमेकांना शुभेच्छा देऊन वर्तमान नित्य आनंदी करणे अपेक्षित आहे. याचबरोबर सर्वच धर्मात द्वेष, मत्सर वृत्तीला आळा बसला पाहिजे.

सकल मानवकल्याण साधणारा कोणताही धर्म असो तो धर्मच श्रेष्ठ असून त्याचे पालन करतांना 'कोण्याही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे' या अनुभूतीने सर्व धर्मियांनी वर्तन करावे. सर्वांनी इथे मानवता अखंड रुजवावी! असे झाले तरच खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वर, रमजान ईद, अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती आदि बाबींचे फलित झाले असे म्हणता येईल! तेंव्हा, इथे केवळ प्रदर्शन न होता माणसांचे अमुलाग्र वर्तन बदलावे हीच माफक अपेक्षा! जय जगतज्योती!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com