esakal | पाणीटंचाईच्या झळा आमच्याचं का भाळी?धावेल काय मदतीला मायबाप सरकार संकट काळी!

बोलून बातमी शोधा

null
पाणीटंचाईच्या झळा आमच्याचं का भाळी? धावेल काय मदतीला मायबाप सरकार संकट काळी!
sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : दिवस उजाडल्यापासून सुरू होते ती पिण्याच्या हंडाभर पाण्याच्या शोधासाठी जीवघेणी कसरत. ती रात्री झोपेपर्यंत संपता संपत नाही. हे जणू वीजहीरा तांडावाशियांचे जीवन गाऱ्हाणेच होऊन बसले आहे. कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच सुरू होतो तो पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष. याकडे स्थानिक ग्रामपंचायत ना लोकप्रतिनिधींचे लक्ष त्यामुळे येथील रहिवाशांना पाणीटंचाईच्या झळा आमच्याचं नशीबी का? असा प्रश्न उपस्थित होऊन माय-बाप सरकार तरी आमच्या मदतीला धावून येईल का? अशी आर्त याचना करण्याची वेळ उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे आली आहे.

धारूर तालुक्यात बालाघाटाच्या पर्वत रांगेच्या डोंगरदऱ्यात बंजारा समाजाची तीस-पस्तीस कुटुंबाचे वीजहीरा तांडा हे रूईधारूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारं छोटसं गाव आहे. कधीकाळी डोंगराच्या दरीत आकाशातून वीज कोसळून पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले. पाण्याची सोय झाल्याने या लगत बंजारा समाजाच्या कुटुंबांनी वास्तव्य केल्याने या लोक वस्तीला वीजहीरा तांडा नावाने ओळखले जाऊ लागले. मात्र पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वर्षानूवर्षे कमी होत गेल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली. सध्या परिस्थितीत येथील ग्रामस्थांची नैसर्गिक रित्या पाण्याची तहान भागविणाऱ्या वीजहिऱ्याचा झराही काळाच्या ओघात आटताना दिसत आहे.

येथील हसण्या-बागडण्याचा आनंद घेण्याच्या बालवयात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी तीस-पस्तीस फुट खोलीच्या विहिरीत जीव धोक्यात घालून दोरीच्या साहाय्याने तर कधी दोरीविना चिमुकल्यांना जीव धोक्यात घालून चढउतार करून वाटीने पाण्याचा हंडा भरून तहान भागवावी लागत आहे. गेल्या वर्षी 'सकाळ'च्या माध्यमातून प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल घेऊन समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी भेट देऊन भीषण पाणीटंचाईची परिस्थिती पाहून दहा हजार लीटर क्षमतेची टाकी दिली. मात्र पाण्याचा स्त्रोत नसल्याने तीही कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले असल्याने जिल्हा प्रशासनातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वीजहिरा तांड्यास भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देऊन पाण्याची समस्या सोडवून येथील जनतेचा पाण्यासाठी होणारा जीवघेणा संघर्ष थांबविण्याची आवश्यकता आहे.