esakal | करणी-भानामतीच्या नावाखाली महिलेची फसवणूक, भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

काळा पैसा बदलणाऱ्या बॅंक कर्मचाऱ्यावर गुन्हा

करणी-भानामतीच्या नावाखाली महिलेची फसवणूक, भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (जि.बीड) : तुमच्या घरातील करणी-भानामती (Superstition) व गुप्तधन काढून देतो, असे म्हणून एका पस्तीस वर्षीय महिलेची सहा लाख रूपये आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून धारूर पोलिस ठाण्यात (Dharur Police Station) भोंदुबाबा विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या तक्रारीने अनेक दिवसांपासून भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूबाबाचे दुष्कृत्य समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.तालुक्यातील (Keij) आडस येथील वैजेनाथ बळीराम मेहत्रे (वय६२) हा मागील पंचवीस-तीस वर्षांपासून जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन करणी-भानामतीच्या नावाखाली सामान्यांची आर्थिक लूट करत महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याचे (Maharashtra Anti Magic Act) राजरोसपणे उल्लंघन करत आहे. (Beed Crime News Case File Against Man For Superstition Keij)

हेही वाचा: राज्यात 21 जिल्ह्यांत दिलासादायक चित्र; 14 जिल्ह्यांत चिंता कायम

आर्थिक फसवणूक झालेल्या स्वाती दत्ता खाडे या महिलेने संबंधित भोंदूबाबाच्या विरोधात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. त्या व त्यांचे पती शेती करतात. त्यांना तीन मुली आहेत. वर्षभरापूर्वी वैजेनाथ मेहत्रे (महाराज) त्यांच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी तुमच्या घरात गुप्तधन आहे, ते मी काढून देतो. मात्र त्यापूर्वी तुमच्यावर केलेले केलेले करणी-भानामती काढावी लागते. ती मी काढतो असे सांगितले. पतीला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सव्वीस जानेवारी रोजी पन्नास हजार रुपये घेतले. त्यानंतर दोन फेब्रुवारी रोजी एक लाख, पंचवीस फेब्रुवारी रोजी दोन लाख रूपये असे एकूण साडेतीन लाख रूपये साक्षीदारासमोर दिले. त्यानंतर चौदा मार्च रोजी वैजेनाथ मेहत्रे यांनी त्यांच्या घरी येऊन म्हणाले, आपले ठरलेले पैसे दिल्याशिवाय मी गुप्तधन काढून देणार नाही. त्यावेळी ते पती-पत्नी म्हणाले, तुम्हाला आतापर्यंत साडेतीन लाख रूपये दिले आहेत.

त्यावर मेहत्रे म्हणाले, अगोदर राहिलेले पैसे द्या. त्यामुळे आम्ही परत अडीच लाख दिले. ठरल्याप्रमाणे एकूण सहा लाख रूपये दिले. त्यानंतर आतातरी राहत्या घरातील गुप्तधन काढुन करणी-भानामती दुरूस्ती करण्याची विनंती केली. त्यावर ते म्हणाले तुमच्यावर खूप मोठे संकट आहे, ते अगोदर दूर करू असे सांगून टाळाटाळ करत सहा लाख रूपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी (ता.१२) वैजेनाथ मेहत्रे याच्या विरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक अनंत अडागळे हे करित आहेत.