पान ४ अँकर
----
अवघ्या ३०० रुपयांत ‘कल्याणकारी मंडळा’च्या योजनांचा मार्ग मोकळा
बीडमधील प्रवासी वाहनचालकांना मोठा दिलासा; मुदत संपण्यापूर्वी नूतनीकरणाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १३ ः बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, ऊन-पावसाची पर्वा न करता प्रवाशांची सुरक्षित ने-आण करणाऱ्या हजारो वाहनचालकांसाठी ‘कल्याणकारी मंडळा’चे सदस्य होणे ही महत्त्वाची योजना आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे रखडलेली ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’ची सदस्यत्व नूतनीकरण प्रक्रिया आता पुन्हा पूर्ववत झाली आहे. ज्या चालकांचे सदस्यत्व नूतनीकरणाअभावी रद्द होण्याच्या मार्गावर होते, त्यांना आता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अवघ्या ३०० रुपयांमध्ये आपले सदस्यत्व नूतनीकरण करण्याची विशेष सवलत देण्यात आली आहे. मात्र, ही मुदत संपल्यानंतर १ जानेवारी २०२७ पासून याच नूतनीकरणासाठी चालकांना थेट ८०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहनचालकांनी या संधीचा तातडीने लाभ घेणे आवश्यक बनले आहे.
बीड जिल्ह्याचा विचार केला तर, मध्यवर्ती बसस्थानक ते अगदी ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर प्रवासी वाहतूक करणारा एक मोठा वर्ग आहे. आर्थिक अस्थिरता, वाढती महागाई आणि रोजच्या प्रवासातील धोके यामुळे या चालकांचे जीवन कायम असुरक्षित असते. शासनाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यास विलंब केल्यामुळे काही सदस्यांचा नूतनीकरणाचा मूळ कालावधी आणि त्यानंतरचा ९० दिवसांचा वाढीव कालावधीही संपुष्टात आला होता. मात्र, आता या मुदत संपलेल्या सदस्यांना ३०० रुपयांत नूतनीकरणाची विशेष सवलत देऊन शासनाने मोठा आधार दिला आहे.
----
कोण होऊ शकते सदस्य0
या योजनेच्या लाभाविषयी ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक वाहनचालकांमध्ये संभ्रम असतो. शासनाच्या निकषांनुसार, ॲप-आधारित कॅब, मॅक्सी कॅब, पर्यटन वाहने, स्कूल बस आणि अन्य प्रवासी वाहने चालविणारे पात्र चालक या योजनेचे सदस्य होऊ शकतात. बीड शहरासह जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, माजलगाव आणि आष्टी सारख्या तालुक्यातील जे चालक अधिकृतरीत्या ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी किंवा प्रवासी वाहने चालवतात, ते सर्वजण या मंडळाचे सभासद होण्यास पात्र आहेत.
-----
चालक आणि त्यांच्या कुटुंबासाठी फायदे काय0
या मंडळात नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे हे चालकांच्या कुटुंबाला थेट आर्थिक सुरक्षा आणि स्थैर्य प्रदान करणारे आहेत. मंडळाच्या वतीने खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण लाभ दिले जातात:
- वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ चालकांना १० हजार रुपयांचा विशेष सन्मान निधी दिला जातो.
- दुर्दैवाने अपघात किंवा दुखापत झाल्यास उपचारांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
- चालकांना जीवन विमा संरक्षण मिळते.
- अपघातामुळे जर चालकाला कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता आर्थिक संरक्षण दिले जाते.
- चालकांच्या पाल्यांच्या (मुलांच्या) शिक्षणासाठीही मंडळाकडून विशेष आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून पैशांअभावी मुलांचे शिक्षण थांबू नये.
- ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी किंवा स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी सुलभ कर्ज सुविधाही या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.
---------
सदस्यत्व मिळविण्याची आणि नूतनीकरणाची प्रक्रिया
बीडमधील वाहनचालकांनी नूतनीकरणासाठी किंवा नवीन सदस्यत्वासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘सभासद नोंदणी’चा पर्याय निवडणे आवश्यक आहे. या अर्जात चालकांनी आपली अचूक माहिती भरणे बंधनकारक आहे. यासाठी चालकाकडे स्वतःचे आधार कार्ड, चालू असलेला मोबाईल क्रमांक, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेला वैध वाहनचालक परवाना आणि बॅच असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित प्रवासी वाहनाची आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि परमिटची माहिती ऑनलाइन सादर करावी लागते.
-----
नूतनीकरण न केल्यास सदस्यत्व संपुष्टात
सध्याच्या वाढीव कालावधीत, म्हणजेच ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत नूतनीकरण न केल्यास संबंधित चालकाचे सदस्यत्व कायमचे संपुष्टात येईल. त्यानंतर पुन्हा नोंदणी करण्यासाठी १ जानेवारीपासून ५०० रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसत ८०० रुपये भरावे लागतील. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व प्रवासी वाहनचालक आणि त्यांच्या विविध संघटनांनी या निर्णयाची गांभीर्याने दखल घेत, लवकरात लवकर नूतनीकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे हिताचे ठरणार आहे.