मेन
---
बीडमध्ये हायवा ठरताहेत हैवान
----
बेफाम वाहतुकीकडे पोलिस, आरटीओची डोळेझाक; अंकुश लावणार कोण?
----
बीड, ता. १५ : शहराच्या रस्त्यांवरून सध्या दिवस असो वा रात्र, सुसाट वेगाने धावणाऱ्या हायवा आणि टिपरचालकांनी नागरिकांच्या नाकी दम आणला आहे. गजबजलेल्या रस्त्यांवरून वाहतुकीचे सर्व नियम चिरडत बेफाम वेगाने वाहने पळविणाऱ्या हायवाचालकांमुळे रस्त्यावरून चालणेही अवघड बनले आहे. सोमवारी (ता. १४) घडलेल्या एका गंभीर अपघातात एका अल्पवयीन मुलाला उडवत त्याची स्कूटी चाकाखाली चिरडली. सुदैवाने मुलाचा जीव वाचला असला, तरी या थरारक घटनेमुळे बीडकरांमध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड शहरात अवजड आणि बेकायदेशीरपणे वाळू, मुरूम किंवा खडीची वाहतूक करणाऱ्या हायवाचालकांची मुजोरी वाढली आहे. नो एंट्रीच्या वेळांमध्ये आणि गर्दीच्या भागात हे हायवा भन्नाट वेगाने कसे शिरतात? शहरात मुख्य नाके आणि पोलिस चौक्या असतानाही हे अवैध हायवा कोणाच्या आशीर्वादाने बिनधास्त धावत आहेत? असे सवाल आता नागरिक विचारत आहेत. नियम आणि शिस्त धाब्यावर बसवून धावणाऱ्या या यमदूतांवर वेळीच वेसण घातली नाही, तर भविष्यात मोठा जीवघेणा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी घडलेल्या घटनेत राँग साइडने येणाऱ्या हायवाने स्कूटीला धडक दिल्यानंतर मदत करण्याऐवजी चालक पळून गेला.
---
पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा दिखावा
शहरात अशा घटना रोजच्याच झाल्या आहेत. मात्र, वाहतूक पोलिस शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यावर ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. केवळ किरकोळ दंडात्मक कारवाईचा दिखावा करायचा आणि मोकाट फिरणाऱ्या अवैध हायवाचालकांकडे दुर्लक्ष करायचे, असा कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांच्या ढिम्म कारभारामुळे आणि संभाव्य अर्थपूर्ण संबंधांमुळेच या चालकांचे धाडस वाढल्याची चर्चा शहरात सुरू आहे. बीड शहरातील अनेक भागांत हायवाचालकांची दहशत आहे. चिमुकले विद्यार्थी, वृद्ध आणि दुचाकीस्वारांचे प्राण या बेफाम चालकांमुळे टांगणीला लागले आहेत.
-----
((कोट))
सकाळी लहान मुले शाळेत जाताना आणि दुपारी परतताना रस्त्यावरून हायवा इतक्या वेगाने जातात, की थरकाप उडतो. लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता मोकाट व सुसाट धावणाऱ्या हायवाचालकांवर कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.
- संतोष गायकवाड, शिक्षक
---
((कोट))
नगर रोडवर हायवाचालकांची गुंडगिरी प्रचंड वाढली आहे. नो एंट्री असतानाही हे बेफाम चालक गाड्या शहरात घुसवितात. सोमवारी एका लहान मुलाचा जीव वाचला. पोलिसांनी या यमदूतांवर तत्काळ कारवाई करून त्यांना शहरात येण्यास बंदी घालावी.
- रमेश जाधव, नागरिक
---
((कोट))
अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारे हायवा शहरात कुणाच्या आशीर्वादाने धावतात? वाहतूक शाखेने शहराच्या वेशीवरच यांना अडवले पाहिजे. बेफाम चालकांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर थेट सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.
- डॉ. गणेश ढवळे, सामाजिक कार्यकर्ता
---
((कोट))
शहरात नियमबाह्य धावणाऱ्या हायवा व अवजड वाहनांवर वाहतूक शाखेची बारीक नजर आहे. नो एंट्रीच्या वेळेत शहरात प्रवेश करणाऱ्या आणि राँग साइडने अतिवेगात वाहने चालविणाऱ्या हायवाचालकांविरुद्ध विशेष मोहिमेदरम्यान वाहने जप्त केली जातील. वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) रद्द करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. नागरिकांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या एकाही मुजोर चालकाला पाठीशी घालणार नाही.
- वैभव पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, बीड