जिल्ह्यात १६ ठिकाणी रोजगार महाकुंभ
१८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
---
बीड, ता. ११ ः जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना एकाच छताखाली नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी (ता. २९) जिल्ह्यात १६ ठिकाणी रोजगार महाकुंभ मेळावा होणार आहे.
राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या ५०० पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचा एक भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या वतीने हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती या संकल्पनेवर हा उपक्रम राबवला जात आहे. या मेळाव्यात १८ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळतील. जिल्ह्यातील १६ प्रमुख महाविद्यालये व आयटीआय केंद्रांवर या महाकुंभचे आयोजन केले जाणार आहे. बंकट स्वामी महाविद्यालय, के.एस.के. महाविद्यालय, सावरकर महाविद्यालय, जन शिक्षण संस्थान आणि स्व. विनायकराव मेटे शासकीय आयटीआय. खोलेश्वर महाविद्यालय व शासकीय कृषी महाविद्यालय (अंबाजोगाई), वसंतदादा पाटील महाविद्यालय (पाटोदा), कालिका देवी महाविद्यालय (शिरूर कासार), आर.बी.अट्टल महाविद्यालय (गेवराई), सिद्धेश्वर महाविद्यालय (माजलगाव), जिजाऊ महाविद्यालय (धारूर), ताराबाई महाविद्यालय (वडवणी), शासकीय आयटीआय (आष्टी), गोपीनाथ मुंडे शासकीय आयटीआय (मलकापूर, परळी) आणि महादजी शिंदे शासकीय आयटीआय (केज). या मेळाव्यात बँक, पतसंस्था, मल्टिस्टेट, हॉस्पिटल्स, ऑटोमोबाईल्स, पेट्रोल पंप आणि साखर कारखान्यांसह सर्व खाजगी उद्योगांना रिक्त पदांची माहिती गुगल लिंकद्वारे किंवा प्रशासनाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी तातडीने महास्वयं पोर्टलला भेट देऊन आपली ऑनलाइन नोंदणी करावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.