आपचे बीडमध्ये लक्षवेधी घंटानाद आंदोलन
बीड ः विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया तातडीने रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम आदमी पार्टीतर्फे शनिवारी (ता. १७) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या प्रक्रियेमुळे पात्र मतदारांचे अधिकार बाधित होऊ नयेत व नाव वगळले जाऊ नये, अशी मागणी करत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपालांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले. जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रा.ज्ञानेश्वर राऊत, सय्यद सादेक, रफिक पठाण, कृष्णा जगताप, आजम खान, डॉ.गणेश ढवळे, राजेंद्र आमटे, डॉ.संजय तांदळे, फारूक इनामदार पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
------
चोरट्यांकडून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास
परळी वैजनाथ ः शहरातील समता नगर भागात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून चार लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज पळवल्याची घटना शनिवारी (ता. १७) पहाटे घडली. व्यंकटराव कड हे रुग्णालयात असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पहाटे घरात प्रवेश करून कपाटातील दागिने व दोन लाख रुपयांची रक्कम असा ऐवज पळवला. याप्रकरणी त्यांचे जावई सायस मुंडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
------
लिंबाचे फाटे तोडण्याच्या वादातून हल्ला
बीड ः वांगी (ता. बीड) येथे सामायिक बांधावरील लिंबाचे फाटे तोडण्याच्या वादातून दोघा बापलेकांनी ७० वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. फिर्यादी पंढरीनाथ महादेव कोलुगडे (वय ७०, रा. वांगी) हे १६ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतातील बांधावरील लिंबाचे फाटे तोडत होते. यावेळी तिथे आलेल्या देवकादास केरू शेळके व मुलगा विजय देवकादास शेळके यांनी वाद घातला. विजयने त्यांना पकडून ठेवले, तर देवकादासने हातातील कुऱ्हाड हिसकावून घेत त्यांच्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात ते जखमी झाले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------
गंठण पळवणाऱ्या चोरट्याला पोलिसांकडून अटक
परळी वैजनाथ ः येथील बसस्थानकात एका महिला प्रवाशाचे सोन्याचे गंठण पळवणार्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील सुनिता राऊत या गेल्या सोमवारी (ता. ५) दुपारी चारच्या सुमारास येथील बसस्थानकात परळी-पाथरी या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १२.५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून पलायन केले होते. याप्रकरणी श्रीमती राऊत यांच्या फिर्यादीवरून येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी माणिक जाधव या आरोपीस सोमवारी (ता. १२) बीड येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संभाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री केदार व त्यांचे सहकारी करीत आहेत.