----
रस्ता कमी, दणकेच जास्त; गतिरोधकांमुळे मणके खिळखिळे
नियमबाह्य स्पीड ब्रेकर्सचे जाळे; गाडी चालवायची की सर्कस करायची?
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १३ ः गाडी थोडी जरी वेगात असली आणि अचानक अंधारात हा डोंगरासारखा गतिरोधक समोर आला, की काळजाचा ठोकाच चुकतो. पाठीत भयंकर कळा येतात आणि गाडीचे तर पार नुकसान होते. इथं रस्ता कुठेय? नुसते स्पीड ब्रेकरच आहेत! बीड शहरातील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाची आणि सामान्य नागरिकाची ही प्रातिनिधिक आणि उद्विग्न अवस्था आहे. राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो वा शहरातील मुख्य रस्ते; बीडमध्ये सध्या वाहन चालवणे म्हणजे एखाद्या थरारक सर्कशीतील कसरतीसारखेच झाले आहे. रस्ता कमी आणि जीवघेणे गतिरोधक जास्त, अशी अत्यंत बिकट अवस्था शहरातील प्रमुख मार्गांची झाली असून, यातून रस्ता प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचा ढिसाळ व अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी गतिरोधक बांधले जातात; मात्र बीडमध्ये हेच गतिरोधक आता अपघातांचे मुख्य कारण बनत आहेत. अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चराटा फाटा या अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरात तब्बल १० ते १५ लहान-मोठे गतिरोधक उभारण्यात आले आहेत. दुसरीकडे, बार्शी नाका ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावर तर कहरच झाला आहे. या रस्त्यावर किमान २० पेक्षा जास्त गतिरोधकांचा खच पडलेला पाहायला मिळतो. याचा सरळ अर्थ असा की, दर शंभर ते दोनशे मीटरवर वाहनचालकांना गाड्यांचे ब्रेक दाबावे लागत आहेत. या अवाढव्य आणि अशास्त्रीय पद्धतीने उभारलेल्या गतिरोधकांमुळे नागरिकांना मणक्याचे व पाठीचे गंभीर आजार जडत असून, गाड्यांचे क्लच, ब्रेक आणि शॉकअप्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
कायद्याच्या आणि तांत्रिक नियमांच्या चौकटीत पाहिल्यास, गतिरोधक उभारण्यासाठी भारतीय रस्ते काँग्रेस या संस्थेने काही निश्चित मानके आणि नियम आखून दिले आहेत. या नियमांनुसार गतिरोधकाची उंची व रुंदी ठराविक असावी लागते आणि तो लांबून दिसावा यासाठी त्यावर पांढरे पट्टे (थर्मोप्लास्टिक पेंट) किंवा रात्री चमकणारे रिफ्लेक्टर्स लावणे अत्यंत अनिवार्य आहे. परंतु, बीड शहरातील एकाही गतिरोधकावर असे पट्टे मारलेले नाहीत. स्थानिक नागरिक किंवा कंत्राटदारांनी कोणतीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने सिमेंट आणि डांबराचे भलेमोठे ''डोंगर'' रस्त्यांवर उभे केले आहेत. रात्रीच्या अंधारात हे गतिरोधक न दिसल्यामुळे दुचाकीस्वार जोरात आदळून गंभीर अपघात घडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
शहरातील व्यस्त आणि प्रमुख मार्गांवरील हे सर्व अवैधानिक आणि नियमबाह्य गतिरोधक प्रशासनाने तात्काळ हटवावेत, अशी जोरदार मागणी बीडमधील वाहनधारक आणि सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. ज्या ठिकाणी खरोखरच गरज आहे, तिथेच नियमांनुसार आणि रिफ्लेक्टर्स असलेले प्रमाणित गतिरोधक बसवावेत. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास, रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्रस्त बीडकरांनी दिला आहे.
-----
रुग्ण, गर्भवती महिला आणि वृद्धांचे हाल
या अवाढव्य आणि जीवघेण्या गतिरोधकांचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स), गंभीर आजारी रुग्ण, वृद्ध नागरिक आणि गरोदर महिलांना बसत आहे. एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला घेऊन वेगाने रुग्णालयाकडे धावणाऱ्या रुग्णवाहिकेला दर काही मीटरवर लागणाऱ्या दणक्यांमुळे रुग्णाचा जीव अक्षरशः टांगणीला लागतो. मणक्याचे आजार असलेल्या नागरिकांसाठी या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे एखादी मोठी शिक्षा भोगण्यासारखेच झाले आहे.
----
प्रशासनाला बळी जाण्याची प्रतीक्षा आहे का?
रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी गतिरोधक आवश्यक असले, तरी ते योग्य ठिकाणी आणि शास्त्रीय नियमांनुसारच असणे बंधनकारक आहे. मात्र, बीडमध्ये रस्ता प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संगनमताने वाट्टेल तिथे गतिरोधक उभारण्याचा धडाका सुरू आहे. नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या या प्रशासनाला, या धोकादायक गतिरोधकांमुळे एखाद्याचा नाहक बळी गेल्यावरच जाग येणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
-----
कोट
बीड शहरात गाडी चालवणे म्हणजे मणक्याचा आजार ओढावून घेण्यासारखे झाले आहे. बार्शी नाका ते संभाजी महाराज चौकादरम्यान इतके गतिरोधक आहेत की दर काही मीटरवर ब्रेक दाबावा लागतो. या अवाढव्य गतिरोधकांमुळे वाहनांचे नुकसान होतेच; पण चालकांच्या आरोग्याशीही खेळ सुरू आहे.
- अमोल काजळे, दुचाकीस्वार, बीड
------
रात्रीच्या वेळी या गतिरोधकांवर एकही पांढरा पट्टा किंवा रिफ्लेक्टर दिसत नाही. अंधारात अचानक समोर गतिरोधक आल्याने दुचाकी जोरात आदळून मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने हे जीवघेणे गतिरोधक लवकरात लवकर काढून नियमानुसार योग्य तेच ठेवावेत.
- अनिल जाधवर, दुचाकीस्वार, बीड
------
फोटो कॅप्शन
बीड : शहरातील रस्त्यांवर शास्त्रीय नियमांचा फज्जा उडवत उभारण्यात आलेले अवाढव्य गतिरोधक. त्यांच्यावर रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने चित्र आहे. (छायाचित्र ः कृष्णा शिंदे)