मेन ((फोटो येणार आहेत.))
----
बीडकरांना धाक मोकाट कुत्र्यांचा!
----
- अंगणात खेळणारे चिमुकलेही असुरक्षित
- पालिका प्रशासनावर नागरिकांचा रोष
- नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना सुरूच
- रात्रीच्यावेळी रस्त्यांवरून चालणे धोक्याचे
-----
बीड, ता. १९ : बीड शहर आणि उपनगरांमधील रस्त्यांवर सध्या मोकाट कुत्र्यांनी असे थैमान घातला आहे, की रस्त्यावरून चालणे तर सोडाच, पण घराच्या अंगणात खेळणेही लहान मुलांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस दिवसेंदिवस वाढत चालला असून, लहान मुलांसह वयोवृद्धांवर कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे सत्र अविरत सुरूच आहे. या गंभीर व भयानक परिस्थितीवर बीड नगर परिषद प्रशासन मात्र हातावर हात ठेवून मूग गिळून बसले आहे. प्रशासनाच्या या बेफिकीर आणि आळशी कारभारामुळे बीडकरांमध्ये तीव्र संताप व भीतीचे सावट पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी स्वराज्यनगर भागात एका लहान मुलीवर मोकाट कुत्र्याने अचानक जोरदार हल्ला चढवून तिला गंभीर चावा घेतला होता. या घटनेत चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात पडून गंभीर जखमी झाली होती. या भीषण घटनेची शाई वाळते न वाळते तोच, धांडेनगर परिसरातील शिवतेजनगर येथे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खेळत असलेल्या एका लहान मुलावर मोकाट कुत्र्यांच्या अख्ख्या टोळक्याने हल्ला चढवला. सुदैवाने, ऐनवेळी शेजारील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तातडीने धाव घेत मोठ्या हिमतीने त्या चिमुकल्याला कुत्र्यांच्या जबड्यातून बाहेर काढले, अन्यथा भयंकर अनर्थ घडला असता. शहरात अशा प्रकारे रोज कुठे ना कुठे मोकाट कुत्र्यांचे हल्ले होत असताना पालिका प्रशासनाला मात्र याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. ज्या दिवशी एखादी मोठी घटना घडते, वृत्तपत्रांत बातम्या येतात किंवा नागरिक आक्रमक होतात, फक्त त्याच दिवसापुरते पालिकेचे अधिकारी भानावर आल्याचे नाटक करतात. ‘आम्ही धरपकड मोहीम राबवू, कुत्र्यांचे निर्बीजीकरण करू’ अशा पोकळ व गाजर दाखविणाऱ्या वल्गना प्रशासनाकडून केल्या जातात. मात्र, दुसऱ्या दिवशी परिस्थिती पूर्ववत होते. प्रशासनाची ठोस कारवाई आणि उपाययोजना पूर्णपणे शून्य असल्याचे दरवेळी सिद्ध होत आहे. नगरपालिकेने आता तात्पुरती मलमपट्टी करणे बंद करून शहरातील सर्वच प्रभागांमधून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा पालिकेच्या या निष्काळजी कारभाराविरोधात त्रस्त नागरिक आणि पालक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा बीडकरांनी दिला आहे.
----
रस्त्यांवर कुत्र्यांचे टोळके; रात्रीला फिरणे धोक्याचे
शहरातील मुख्य बाजारपेठ, गल्लीबोळ, बसस्थानक परिसर आणि सर्वच उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळकेच्या टोळके रस्त्यावर फिरताना दिसतात. रात्रीच्यावेळी तर दुचाकीस्वारांच्या मागे लागणे, पादचाऱ्यांवर अचानक धावून जाणे, लहान मुलांना लक्ष्य करणे हा रोजचाच प्रकार झाला आहे. कामावरून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या कामगारांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना हातात काठी घेतल्याशिवाय जाता येत नाही, इतकी बिकट अवस्था झाली आहे.
-----
निर्बीजीकरण अन् धरपकड मोहीम कागदावरच
शासकीय नियमांनुसार मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करणे आणि त्यांना पकडून रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे पालिकेचे वैधानिक कर्तव्य आहे. या कामासाठी कागदोपत्री मोठा निधी दाखविला जातो का? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. कारण प्रत्यक्ष रस्त्यावर कुत्र्यांची संख्या घटण्याऐवजी अनेक पटींनी वाढताना दिसत आहे. प्रशासनाची हीच ढिसाळ नीती उद्या कोणाचा तरी बळी घेणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
----
पालिकेचा ‘संथ’ कारभार; जीव टांगणीला
नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा थेट संबंध असलेल्या प्रश्नांवरही बीड नगर परिषद प्रशासनाचा कारभार अत्यंत संथ आणि कासवगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या, त्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण यांसारख्या गंभीर बाबींवर ठोस धोरण राबविण्याऐवजी पालिका प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आहे. एकीकडे लहान मुलांवर हल्ले होऊन ते गंभीर जखमी होत असताना, दुसरीकडे पालिका अधिकारी मात्र एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. प्रत्येक घटनेनंतर दिला जाणारा आश्वासनांचा डोस आणि प्रत्यक्षातील शून्य अंमलबजावणीमुळे प्रशासनाच्या या बेफिकीर आणि संथ कारभाराची किंमत बीडकरांना स्वतःचा जीव मुठीत धरून मोजावी लागत आहे.
----
((कोट))
घराच्या अंगणात किंवा गल्लीत लहान मुले खेळत असतील, तरी आता भीती वाटते. कुत्र्यांचे टोळके अचानक चालून येते. प्रशासन आणखी किती मुलांचे रक्त सांडण्याची वाट पाहणार आहे? पालिकेने कागदी घोडे न नाचविता तातडीने कुत्र्यांची धरपकड सुरू करावी.
- अनिकेत भोसले, स्वराज्यनगर
------
((कोट))
कामावरून रात्री उशिरा घरी परतताना दुचाकींच्या मागे ५-६ कुत्रे धावून येतात. अनेकदा दुचाकी घसरून अपघात झाले आहेत. हातात काठी घेतल्याशिवाय रस्त्यावरून चालता येत नाही. पालिकेचे अधिकारी कोणत्या जगामध्ये वावरत आहेत?
- राज जाधव, धांडेनगर
---
((कोट))
केवळ आश्वासन नको, तर ठोस कारवाई हवी. पालिकेने विशेष पथक तयार करून शहरातील प्रत्येक प्रभागातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबविली पाहिजे.
- सुहास शिंदे, बीड
-----
((कोट))
शासकीय नियमावली आणि प्राण्यांच्या हक्कांसंदर्भातील गाइडलाइन्सनुसार पालिका प्रशासनाला शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून केवळ त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करून पुन्हा त्याच भागात सोडावे लागते. त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविता येत नाही. महापालिकेतर्फे हे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत शहरातील ८४० कुत्र्यांचे निर्बीजीकरण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या निर्बीजीकरण आणि लसीकरण झाल्यानंतर कुत्र्यांमधील आक्रमकता आणि हल्ला करण्याची प्रवृत्ती लक्षणीयरीत्या कमी होते. शहरात ही मोहीम सातत्याने राबविली जात असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- इंजि. प्रमोद माने, नगर परिषद, बीड