पान ४ लीड

पान ४ लीड
Published on: 
पान ४ लीड ----- हवामानाचा दुहेरी खेळ: पहाटे हुडहुडी, तर दुपारी उन्हाचा चटका दुहेरी ऋतूंचा प्रभाव; नागरिकांना काळजी घेण्याचे आरोग्‍य प्रशासनाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २५ ः सध्या बीड जिल्ह्यात निसर्गाचा एक अत्यंत वेगळा आणि दुहेरी खेळ पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव बीडकर घेत आहेत. पहाटे आणि रात्रीच्या वेळी जाणवणारी बोचरी थंडी आणि त्यानंतर थेट दुपारी जाणवणारा कडक उन्हाचा चटका, अशा दुहेरी हवामानामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. तापमानातील या मोठ्या तफावतीचा थेट फटका नागरिकांच्या आरोग्यासोबतच शेतीलाही बसत आहे. आजच्या हवामान आकडेवारीनुसार, सकाळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले, तर दुपारी हेच तापमान थेट ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. एकाच दिवसात तापमानात १५ अंशांची तफावत असल्याने मानवी शरीराला आणि पिकांनाही या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जात आहे. सकाळच्या वेळी शहरासह ग्रामीण भागातही नागरिक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः पहाटे शतपावलीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या थंडीमुळे काहीशी घटल्याचे किंवा लोक उशिरा बाहेर पडत असल्याचे दिसून येते. सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत हवेत चांगलाच गारवा असतो. मात्र, जसजसा सूर्य वर येतो, तसतशी थंडी गायब होऊन उन्हाचा चटका जाणवू लागतो. दुपारच्या वेळी आकाश पूर्णपणे निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता अधिकच वाढते. दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत उन्हाचा कडक चटका जाणवत असल्याने बीड शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि बसस्थानक परिसरात काहीशी शांतता पाहायला मिळते. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वार आणि पादचारी रुमाल, स्कार्फ, टोपी आणि छत्रीचा आधार घेताना दिसत आहेत. या बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आणि घशाचे संसर्ग यांसारख्या विषाणूजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना या हवामानाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ------ बदलत्या हवामानात आरोग्याची अशी घ्या काळजी सध्याच्या लहरी वातावरणामुळे आजारी पडण्याचा धोका वाढला आहे. यासाठी दैनंदिन सवयींमध्ये काही साधे पण महत्त्वाचे बदल करणे गरजेचे आहे. सकाळी घराबाहेर पडताना अंगात उबदार कपडे किंवा कानटोपी असावी, तर दुपारी बाहेर जाताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. घसा खवखवणे किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी. रात्री झोपतानाही पुरेशी पांघरूणे घ्यावीत. आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने औषधोपचार करणे पूर्णपणे टाळावे, असेही आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ----- आहार व जीवनशैलीत करा बदल हवामानाचा हा दुहेरी खेळ सहन करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आहारात ताज्या, गरम आणि सकस अन्नाचा समावेश करा. व्हिटॅमिन ‘सी’ युक्त फळे जसे की संत्री, मोसंबी, आवळा आणि लिंबू यांचे सेवन वाढवा. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दुपारी कडक उन्हातून आल्यावर लगेचच फ्रीजमधील थंड पाणी किंवा बर्फाचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावे, यामुळे घशाचे संसर्ग वाढू शकतात. रात्रीचे जेवण हलके व पचायला सोपे असावे. आहारात हळद-दूध, काढा किंवा आल्याचा चहा यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास संसर्गापासून उत्तम बचाव होतो. ----- कोट सध्याच्या बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशाचे संसर्ग यांसारख्या विषाणूजन्य आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सकाळी आणि दुपारी तापमानात असलेली मोठी तफावत शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट ताण आणते. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांनी, योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी बाहेर पडताना उबदार कपडे घालावेत आणि दुपारी उन्हात फिरताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरावा. तसेच, पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. - डॉ. श्रेयश देशपांडे, माजलगाव -------- सकाळी असणारा कडाक्याचा गारवा आणि दुपारी वाढणारा उन्हाचा चटका यामुळे श्वसनाचे आजार आणि ॲलर्जीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः दम्याच्या रुग्णांना या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका बसत असून, हवेतील कोरडेपणामुळे श्वास घेण्यास त्रास होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठांनी सकाळी कोवळे ऊन पडल्यानंतरच घराबाहेर पडावे आणि थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी मास्कचा आवर्जून वापर करावा. - डॉ. प्रताप लेंडाळ, माजलगाव ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com