बीडमध्ये भाजीपाल्याची आवक घटली
--------
व्यापाऱ्यांना मेथी, कोथिंबीर, पालक बाहेरून आणण्याची वेळ
---------
अभिषेक सोळुंके
बीड, ता. ७ : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम आता भाजीपाला उत्पादनावरही जाणवू लागला आहे. काही दिवसांपासून शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, स्थानिक शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालात घट झाली आहे. त्यामुळे मेथी, कोथिंबीर आणि पालक यांसारख्या पालेभाज्या बाहेरून आणाव्या लागत आहेत. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाच आता रोजच्या जेवणातील भाजीपाल्याच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम होत आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून बाजारातील भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मेथी, कोथिंबीर, मिरची, पालक, गवार आणि शेवगा या भाज्यांच्या आवकेत विशेष घट झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून बाजारात येणारा माल कमी झाल्याने शहराची गरज भागविण्यासाठी व्यापाऱ्यांना बाहेरील बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः बटाटा, टोमॅटो, काकडी आणि गाजर यांसारख्या भाज्याही बाहेरील जिल्ह्यांतून मागवाव्या लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आगामी काळात आवक आणखी कमी झाल्यास त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावरही होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
यावर्षी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर भाजीपाला पिकांनाही पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बाजारात येणारा भाजीपाला कमी झाला आहे. भाजीपाला हे अल्प कालावधीचे पीक असल्याने पाण्याची उपलब्धता कमी होताच त्याच्या उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.
-----
सध्या भाजीपाल्यांचा दर असा
सध्या बाजारात पालक १० रुपये जुडी, मेथी २० रुपये, तर कोथिंबीर २० रुपये जुडी, भेंडी ४० रुपये किलो, गवार १०० रुपये किलो, वांगी ४० रुपये किलो, टोमॅटो २० रुपये किलो, पत्ताकोबी २० रुपये किलो, कांदा ६० रुपये किलो, बटाटा २० रुपये किलो, मिरची ६० रुपये किलो, तर शेवगा १०० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
-------
((कोट))
सध्या बाजारात सर्वच भाजीपाल्याची आवक हळूहळू कमी होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारा माल कमी झाल्याने बाहेरून भाजीपाला आणावा लागत आहे. पुढील एक महिन्यानंतर परिस्थिती आणखी अवघड होऊन आवक आणखी घटण्याची शक्यता आहे.
- अशोक म्हेत्रे, भाजीपाला विक्रेता
----
((कोट))
यंदा पाऊसच झाला नाही, त्यामुळे शेतातली सगळी पिकं गेली. विहीर, बोअरचं पाणीही आता तळाला गेलंय. पाणी नसल्यामुळे भाजीपाला लावायचा तरी कसा? जेवढा थोडाफार लावला होता, तोही पाण्याअभावी नीट निघाला नाही. त्यामुळे बाजारात भाजीपाला आणणं कमी झालंय.
- रवींद्र राऊत, शेतकरी