पान ४ लीड
---
गळती रोखण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
पालिकेचे आदेश हवेतच; जिल्ह्यात अवघा १२.३२ टक्के पाणीसाठा
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ३१: जिल्ह्यावर पाणीटंचाईचे भीषण आणि गडद संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यातील अपुऱ्या पावसामुळे सध्या जिल्ह्यात केवळ १२.३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. बीड शहराची तहान भागवणाऱ्या ऐतिहासिक बिंदूसरा धरणातील जलसाठा अवघ्या ३.५६ टक्क्यांवर आला आहे, तर जिल्ह्याची भिस्त असलेल्या माजलगाव धरणात अवघे २२ टक्के पाणी उरले आहे. एकीकडे पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असताना, दुसरीकडे बीड नगर पालिकेच्या मुख्य जलवाहिनी आणि वितरण व्यवस्थेतील व्हॉल्व्हमधून हजारो लिटर शुद्ध पाण्याची रोज नासाडी होत आहे. जलवाहिनीची गळती तात्काळ रोखण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने दिलेले आदेश केवळ कागदावरच राहिले असून, प्रत्यक्षात ग्राउंडवरील कारवाई शून्य असल्याने आगामी काळात बीडकरांवर पाण्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची वेळ ओढवणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न बरसल्याने खरिपापासूनच दुष्काळाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. आता पावसाळा संपला असला, तरी उपलब्ध जलसाठ्यात वेगाने आणि सतत घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील पाणीपुरवठ्याचे मोठे आणि खडतर आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. बीड जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण १६४ जलप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने आताच तळ गाठला आहे. सध्याच्या अत्यंत चिंताजनक आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील तब्बल ५० जलप्रकल्प पूर्णपणे कोरडेठाक पडले आहेत. याशिवाय ७३ प्रकल्पांमधील पाणी थेट ज्योत्याखाली (डेड स्टोरेज) गेले आहे. उर्वरित ४० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा उरला आहे.
बीड शहराला जीवनदान देणाऱ्या ऐतिहासिक बिंदूसरा धरणाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या धरणातील जलसाठा आता केवळ ३.५६ टक्क्यांवर येऊन ठेपल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. हा नगण्य पाणीसाठा अत्यंत भयानक ठरत आहे. पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत असताना, शहराची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाला कोणत्याही प्रकारचे ठोस नियोजन करता आलेले नाही. तसेच, जिल्ह्याची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या माजलगाव धरणातही आता फक्त २२ टक्केच पाणीसाठा उरल्यामुळे शेतीच्या सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
पाण्याची एवढी भीषण टंचाई असताना आणि उपलब्ध साठा अपुरा पडत असताना, शहरातील मुख्य जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेवरील व्हॉल्व्हमधून दररोज हजारो लिटर शुद्ध पाणी विनाकारण रस्त्यावर वाहून जात आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याच्या तक्रारींनंतर नगर पालिकेने मुख्य पाइपलाईन आणि व्हॉल्व्हमधील गळती तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रशासनाने केवळ आदेश देऊन आपली पाठ थोपटून घेतली आहे. पंधरा दिवस उलटून गेले तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. गळती दुरुस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतेही विशेष पथक नियुक्त केलेले नाही किंवा तातडीची मोहीम राबवली नाही. नगर पालिकेच्या या सुस्त आणि हलगर्जी कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तर दुसरीकडे नियमित कर भरणारे सामान्य बीडकर मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
------
स्थानिक पातळीवर अंमलबजावणीचा अभाव
पाणीटंचाईच्या तीव्र पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून दररोज एका तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेत आहेत. स्थानिक स्तरावर पाणीसाठ्याचे आणि टँकरचे परिपूर्ण नियोजन करण्याचे कठोर आदेश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. जिल्हाधिकारी या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने पाहत असून प्रशासनाला सक्त सूचना करत आहेत. मात्र, प्रत्यक्ष चित्र वेगळेच आहे. स्थानिक स्तरावरील अधिकारी बैठकीत केवळ गांभीर्य दाखवतात आणि प्रत्यक्षात त्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी करत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
-----
पालिका प्रशासनाचे कागदी घोडे
शहरात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असताना मुख्य जलवाहिनी व वितरण व्यवस्थेतील व्हॉल्व्हच्या गळतीमुळे रोज हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे. ही गळती युद्धपातळीवर बंद करण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनाने देऊन तब्बल पंधरा दिवस उलटले आहेत. मात्र, प्रशासनाच्या या कागदी आदेशावर प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही तातडीचे प्रयत्न होत नसल्याने पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत आहे.
------
अकार्यक्षमतेचा कळस
बिंदूसरा धरणात केवळ ३.५६ टक्केच साठा उरल्याने बीडकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात हजारो लिटर पाणी वाया जात असतानाही नगर पालिकेच्या बेजबाबदार कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही. या गंभीर समस्येबाबत उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांची काही प्रमाणात धावपळ सुरू असल्याचे दिसत असले तरी इतरांना फिकीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.
_____
फोटो कॅप्शन
बीड : खंडेश्वरी मंदिर परिसर परिसरातील मुख्य पाइपलाइन व व्हॉल्व्ह गळतीमुळे रस्त्यावर वाहून जाणारे हजारो लिटर पाणी. (छायाचित्र ः कृष्णा शिंदे)