दिव्यांग पुनर्वसनातील कार्याबद्दल ‘बीयॉंड व्हिजन’चा गौरव
---
लातूर, ता. ६ : मुंबईतील स्नेहांकीत हेल्पलाईन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासार्थ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना गाैरवले जाते. यात दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी लातूर येथे मागील दोन वर्षापासून कार्यरत असलेल्या बीयॉंड व्हीजन फाउंडेशनला ५० हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बीयॉंड व्हिजन फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझनचे अध्यक्ष डॉ. माधव गोरे, सचिव संदीप चोपडे, कोषाध्यक्ष मीरा चोपडे आणि युवा कार्यकर्ता श्रेयश चोपडे यांनी मुंबईतील दादर सभागृहात हा सन्मान स्वीकारला.
यावेळी पत्रकार राजीव खांडेकर, कामत ग्रूपचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल कामत, डिजीटल एक्सेसब्लीटी तज्ञ प्रशांत नाईक, स्नेहांकीत हेल्पलाईन संस्थेच्या मानद अध्यक्षा परीमला भट्ट व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या सन्मानाबद्दल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर, रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. विजय राठी, सुधीर लातूरे, डॉ. राजगोपाल तापडिया, डॉ. गोपीकिशन भराडिया, सुधाकर घारापुरकर, धनंजय चिताडे, डॉ. संजय गवई, डॉ. गुणवंत बिरादार, डॉ. घनश्याम ताडेवाड, माधव पांडे, निळकंठ स्वामी, बी. पी. सूर्यवंशी, नंदकुमार कदम, शीलाताई यादव, श्रीकृष्ण शिंदे यांनी संस्थेचे अभिनंदन केले.