माहिती आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करा!
-----
भाऊराव कारखान्याच्या लाभार्थींची यादी देण्याची मागणी
-------
नांदेड, ता. १४ : भाऊराव सहकारी साखर कारखान्याकडून लाभार्थी सभासद शेतकऱ्यांची यादी प्राप्त करून ती अपिलार्थीला देण्याचे आदेश राज्य माहिती उपायुक्त, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी दिले होते. मात्र, आदेश देऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही यादी मिळाली नसल्याने या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते शंकर इंगळे यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर गोंड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शंकर इंगळे यांनी दाखल केलेल्या अपिलावर राज्य माहिती उपायुक्त, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी १९ मे २०२६ रोजी आदेश दिला होता. त्यानुसार, भाऊराव सहकारी साखर कारखाना, देगाव-येळेगाव यांच्याकडून देय रक्कम असलेल्या लाभार्थी सभासदांची यादी माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ५ (४) अन्वये संकलित करून ३० दिवसांच्या आत, म्हणजेच २४ जून २०२६ पर्यंत अपिलार्थीला उपलब्ध करून देण्याचे निर्देश तत्कालीन प्रादेशिक उपसंचालक श्रीकांत देशमुख यांना देण्यात आले होते. मात्र, निर्धारित मुदत संपून चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटला, तरी संबंधित यादी प्राप्त करून ती इंगळे यांना देण्यात आलेली नाही. यासंदर्भात त्यांनी २५ मे, २४ जून आणि १३ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदने देऊनही कार्यवाही झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी संबंधित कारखान्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी मिळवून ती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यास कारखान्याला कोट्यवधी रुपये द्यावे लागू शकतात, या भीतीने कारखाना यादी देण्यास टाळाटाळ करत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
---
आदेशाच्या अंमलबजावणीकडे लक्ष
राज्य माहिती उपायुक्तांच्या आदेशानंतरही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी उपलब्ध झालेली नसल्याने प्रादेशिक सहसंचालक साखर या प्रकरणात काय कार्यवाही करतात, याकडे हजारो लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शंकर इंगळे यांनी केली आहे.