भोकरदन पालिकेत अंतर्गत राजकारण पेटले!
भोकरदन, ता. १६ (बातमीदार) : येथील नगर परिषदेच्या विकासकामांच्या दर्जावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असतानाच, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक नईम कादरी यांनी थेट नगर परिषद प्रशासनाकडे विकासकामांचा लेखाजोखा मागितला आहे. त्यामुळे पालिकेतील कारभारावर सत्ताधाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवक कादरी यांनी प्रभाग क्रमांक ८ व ९ मधील सन २०२६ मध्ये मंजूर, सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची कामनिहाय माहिती मागविली आहे. कामाचे नाव, मंजूर अंदाजित किंमत, निधीचा स्रोत, निविदा प्रक्रिया, ठेकेदाराचे नाव, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका तसेच नागरिकांच्या तक्रारींवर करण्यात आलेली कारवाई, याबाबतची माहिती त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागितली आहे. विकासकामांमध्ये त्रुटी अथवा नियमबाह्य बाबी आढळल्यास त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याची माहितीही त्यांनी मागितली आहे. त्यांच्या या मागणीमुळे नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत सत्ताधारी लोकप्रतिनिधीनेच प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांच्या दर्जाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आणखी उधाण आले आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर सत्ताधारी गोटातही चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्ष समरीन नाज बेग मिर्झा यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘‘तक्रार करणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्याला माझा विरोध नाही. मात्र, विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’’ असा आरोप केला आहे.