Bibi ka Maqbara : ‘दख्खनचा ताज’ काळवंडला;शतकांची गोष्ट सांगणारा मकबरा गोष्टीत राहू नये!

‘दख्खनचा ताज’ अशी जगविख्यात ख्याती असलेल्या शहरातील ऐतिहासिक बीबी का मकबरा संवर्धनाअभावी काळवंडला आहे. या देखण्या वारसास्थळाचे सौंदर्य बाधित झाले. मकबऱ्याच्या पश्चिम आणि पूर्व दोन्ही बाजूंनी असलेल्या मिनारची जाळ्या निखळल्या.
Bibi ka Maqbara
Bibi ka Maqbarasakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खनचा ताज’ अशी जगविख्यात ख्याती असलेल्या शहरातील ऐतिहासिक बीबी का मकबरा संवर्धनाअभावी काळवंडला आहे. या देखण्या वारसास्थळाचे सौंदर्य बाधित झाले. मकबऱ्याच्या पश्चिम आणि पूर्व दोन्ही बाजूंनी असलेल्या मिनारची जाळ्या निखळल्या. त्यामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग खरंच या वास्तूचे संवर्धन करतो का, असा प्रश्न पुरातत्त्व अभ्यासकांनी उपस्थित केला. हे असेलच चालू राहिले तर शतकांच्या मातृप्रेमाची गोष्ट सांगणारा मकबरा गोष्टीतच राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जगप्रसिद्ध ताजमहालची प्रतिकृती असलेल्या बीबी का मकबऱ्याचीही ख्याती तोडीस तोड अशीच. या वास्तूची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालासारखे. औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगम (राबिया-उद-दुर्राणी) यांची कबर येथे आहे. १६५१ ते १६६१ या काळात औरंगजेबाचा मुलगा आजमशाहकडून आईच्या स्मरणार्थ ही देखणी वास्तू बांधली गेली. या इमारतीच्या प्रमुख इमारतीमध्ये राबिया-उद-दुर्राणी यांची कबर आहे.

या इमारतीच्या बाह्य भागावर फुलझाडे चितारली आहेत. मुख्य इमारतीच्या आतून रंगीबेरंगी चित्रे असून, हे मुघल वास्तुशैलीचे उत्तम उदाहरण आहे. बीबी यांच्या कबरीच्या बाजूला असलेल्या चारही कोपऱ्याला आकर्षक मिनार असून, याला जाळी आहे. पश्चिमेकडील मिनारची जाळी दोन दिवसांपूर्वी पडली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. मात्र, पूर्वेकडील मिनारलाही आता जाळी नाही. इमारतीच्यासमोरच्या भागात पिंपळाची झाडे आहेत. बीबी का मकबरा परिसरात असलेल्या सर्व मिनारवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे. पण, मिनारची जाळी व इतर वास्तू पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत.

आत प्लॅस्टिकचा कचरा

विशेष म्हणजे या वारसास्थळाच्या आत पिण्याच्या पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल, खाण्याचे पदार्थ नेता येत असल्याने परिसरात जागोजागी प्लॅस्टिकचा कचरा दिसतो. म्हणूनच इथे येणारे पर्यटक कुठे तो ताजमहल आणि कुठे हा बीबी का मकबरा, असा प्रश्न विचारत आहेत.

बीबी का मकबरा भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे वारसास्थळ आहे. या वारसास्थळामुळे छान उत्पन्न मिळते. येथील सुरक्षा आणि संवर्धन करणे ही केंद्रीय पुरातत्त्व विभागाची जबाबदारी आहे. इथल्या पेटिंग मिटून गेल्या. दरवाजावरचे नक्षीकाम नष्ट होत आहे. हे आम्ही पुरातत्त्व खात्याच्या वारंवार लक्षात आणून दिले. पूर्वी केंद्रीय पुरातत्त्व खात्यांच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले. इथे कचरा दिसायचा नाही. इतक्या देखण्या, उत्तम आणि राष्ट्रीय वारसास्थळाची आज ही दुरवस्था बघून वाईट वाटते.

— डॉ. दुलारी कुरेशी, इतिहासकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com