पान १ लीड
बीड : शहरात सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर मुख्य पाइपलाइनमधील लिकेज दुरुस्त करण्यासाठी सुरू असलेले युद्धपातळीवरील काम. (छायाचित्र ः कृष्णा शिंदे)
BID26B36083 BID26B36084 BID26B36085
बीडकरांच्या घशाला कोरड; १५ ऐवजी आता थेट १८ दिवसांनी पाणी
पाइपलाइन शिफ्टिंगमुळे ७० टक्के शहराचा पाणीपुरवठा खंडित; महामार्गाच्या कामाचा फटका
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १७ : नशीब फुटकं अन् पाण्यासाठी वणवण, अशीच काहीशी दयनीय आणि विदारक अवस्था सध्या बीडकरांची झाली आहे. आधीच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडलेले असताना, आता प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा आणखी एक मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कामामुळे माजलगाव बँकवॉटरवरून येणारी मुख्य जलवाहिनी (पाइपलाइन) शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे बीड शहरातील तब्बल ७० टक्के भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. आधीच १५ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मिळणारे पाणी आता या तीन दिवसांच्या नव्या तांत्रिक व्यत्ययामुळे थेट १८ दिवसांवर ढकलले गेले आहे. परिणामी, ऐन हिवाळ्यात बीडकरांच्या घशाला कोरड पडली असून पाण्यासाठी त्यांची मोठी फरफट होत आहे.
बीड शहराच्या बाहेरून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पूर्वी सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) देण्यात आलेला नव्हता. मात्र, आता नव्याने या सर्व्हिस रोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रस्ते बांधणीच्या कामात माजलगाव बँकवॉटरवरून बीड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन मोठी अडचण ठरत होती. ही पाइपलाइन सुरक्षित ठिकाणी हलवणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आवश्यक असल्याने प्रशासनाने नाईलाजाने हे काम हाती घेतले आहे.
या कामामुळे माजलगाव बँकवॉटरवर अवलंबून असलेल्या बीड शहराच्या ७० टक्के भागाला १९ नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. या पाणीकपातीचा सर्वाधिक फटका स्वराज्य नगर, शिवाजी नगर, शाहू नगर, गया नगर, शिंदे नगर, आदर्श नगर, अंबिका चौक, राजीव गांधी चौक, संत नामदेव नगर, अंकुश नगर, पालव चौक, जिजाऊ नगर, पंचशील नगर, कृषी कॉलनी, नगर नाका, मित्र नगर, विद्या नगर, बार्शी नाका, राष्ट्रवादी भवन परिसर, वन विभाग कार्यालय परिसर आणि बलभीम चौक या प्रमुख वस्त्यांना बसणार आहे. या सर्व भागांमधील पाण्याचे नियमित चक्र आता तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. मुख्य पाइपलाइन शिफ्ट करण्याच्या या कामादरम्यानच पाणीपुरवठा विभागाने गळती (लिकेज) काढण्याचे कामही हाती घेतले आहे. देवडी शिवारातील तीन आणि जवळा तांड्याच्या अलीकडील एक अशा एकूण चार मोठ्या लिकेज दुरुस्त करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे.
----
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताजवळ ५०० मीटरच्या आत खासगी बोअरवेल घेण्यास शासनाचे आणि प्रशासनाचे कडक प्रतिबंध आहेत. असे असतानाही, बीड शहरात सध्या विनापरवानगी अनधिकृत बोअर मारण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आणि राजरोसपणे सुरू आहेत. प्रशासनाच्या आदेशाला स्पष्टपणे डावलून सुरू असलेल्या या अवैध प्रकारामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावण्याचा आणि भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
-----
पर्यायी व्यवस्थेचा अभाव; नागरिकांमधून तीव्र संताप
पाणीपुरवठा खंडित करताना पालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. शाहूनगर येथील गृहिणी सीमा जाधव संताप व्यक्त करताना म्हणाल्या, आधीच पंधरा दिवसांनी नळाला पाणी यायचं, आता हे लोक आणखी तीन दिवस पुढे ढकलून थेट अठरा दिवसांवर घेऊन गेलेत. ऐन हिवाळ्यात जर पाण्यासाठी अशी वणवण भटकंती करावी लागणार असेल, तर आम्ही जगायचं कसं? प्रशासनाला आमच्या हालांचे काहीच वाटत नाही का? तर गया नगरचे रमेश महानोर म्हणाले, रस्त्याच्या कामासाठी पाइपलाइन शिफ्ट करणे समजू शकतो, पण प्रशासनाने पर्यायी पाणीपुरवठ्याची काहीतरी सोय करायला हवी होती. आमच्या भागात तर पाण्याचा एक थेंबही मिळत नाही आणि खासगी टँकर मागवायचा म्हटला तरी त्यांचे दर आणि हाल वेगळेच असतात.
-----
पालिकेचा ढिसाळ कारभार; कामाचे समर्थन
पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार पूर्णपणे ढिसाळ झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शहरात सार्वजनिक पाण्याचे स्रोत नक्की कुठे आहेत, याची अद्ययावत माहिती खुद्द पालिकेकडेच नाही, हे ऐकून थक्क व्हायला होते. या भोंगळ कारभाराचा फटका फक्त सामान्य जनतेला बसत आहे, अशी खंत बीडचे नागरिक नारायण पवार यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, प्रशासनाची बाजू मांडताना पाणीपुरवठा विभागाचे इंजिनिअर प्रमोद माने यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या कामामुळे पाइपलाइन शिफ्ट करणे अत्यंत गरजेचे असल्यानेच हे काम हाती घेण्यात आले आहे. यासोबतच मुख्य पाइपलाइनवरील चार मोठे लिकेजही काढले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून उपलब्ध पाणी जपून वापरावे.
-----