बिडवे महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर छाप
-----------
लातूर, ता. ८ : एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इ-सेल’ने (एन्टरप्रेन्युअरशिप सेल- एमएसबीईसीएल) राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश संपादन केले आहे. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित ‘नॅशनल एन्टरप्रेन्युअरशिप चॅलेंज’च्या बेसिक ट्रॅकमध्ये बिडवे महाविद्यालयाच्या इ-सेलने देशभरातून ७४ वा राष्ट्रीय रँक पटकावला. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तब्बल १ हजार १०० नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत बिडवे महाविद्यालयाच्या संघाने उत्तम कामगिरी करत एकूण १ हजार ७९० गुण मिळवले आणि राष्ट्रीय स्तरावर अव्वल १०० मध्ये स्थान मिळवले. ‘एन्टरप्रेन्युअरशिप सेल’ (इ-सेल) हा विद्यार्थ्यांद्वारे चालवला जाणारा एक उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवसंशोधन, उद्योजकता, नेतृत्वगुण आणि सर्जनशील विचारांना चालना दिली जाते. तर ‘नॅशनल एन्टरप्रेन्युअरशिप चॅलेंज’ हे महाविद्यालयीन स्तरावर उद्योजकतेचे वातावरण अधिक मजबूत करण्यासाठी विविध प्रात्यक्षिके, उपक्रम आणि आव्हानांच्या माध्यमातून राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देते.
महाविद्यालयाच्या इ-सेलमध्ये विजय चक्रे, नंदिनी येरंडे, श्रेयश बोचरे, जुनैद पटेल, समीक्षा मद्रेवार, प्रसाद बोके, वेदांत पोतदार, धनश्री केंद्रे, राजनंदिनी चव्हाण वैष्णवी पवार यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये डॉ. एन. एम. हालगरे यांनी सल्लगार म्हणून काम केले आहे.