दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
छत्रपती संभाजीनगर ः रांजणगाव शेणपुंजी येथील एका ऑटो कंपनी समोर ८ ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास स्कूटीने समोरून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान ११ ऑक्टोबरला मध्यरात्री १२ः५० ला मृत्यू झाला. संदीप एकनाथ इंगळे (वय ३५, रा. मधुबन कॉलनी, वाळूज) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचे भाऊ अनिल इंगळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, संदीप हे गणेश इंजिनिअरिंग कंपनीत नोकरीला होते. ते पत्नी वैशाली आणि पाच वर्षांच्या मुलीसह वाळूज येथील मधुबन कॉलनीत राहत होते. ८ ऑक्टोबरला दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा अपघात झाला. संदीप हे दुचाकीवरून (एमएच २० डीजी ८३७८) संजय ऑटोकडून सवेरा ऑटोच्या दिशेने जात होते. त्यावेळी क्रमांक नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवरील चालकाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम दत्तनगर येथील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.