बिंदुसराचे पूजन; पणत्यांनी उजळला जलसाठा
बीड, ता. ९ : लक्ष्मीपूजनाला धन-संपत्ती, व्यापारी प्रतिष्ठान, वाहने आणि शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची परंपरा आहे. या परंपरेला सामाजिक आणि पर्यावरणीय कृतज्ञतेची जोड देत आनंदग्राम संस्थेतील मुलांनी शहराची तहान भागविणाऱ्या बिंदुसरा नदीला लक्ष्मी मानून तिचे पूजन केले.
आनंदग्रामचे संचालक दत्ता बारगजे यांच्या पुढाकारातून उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थितीत बीडकरांसह आनंदग्रामलाही आधार देणारा बिंदुसरा धरणातील पाणीसाठा हीच खरी संपत्ती असल्याची भावना मुलांनी व्यक्त केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. तत्पूर्वी मुलांनी धरण परिसरातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या आणि अन्य कचरा गोळा करून स्वच्छता केली. त्यानंतर धरणाच्या काठावर रांगोळी काढून नदीपात्रात पुष्प अर्पण करण्यात आले. अंधार पडताच समई प्रज्वलित करण्यात आली. हातात पणत्या घेऊन बिंदुसराची आरती केली.
-----
नदी संवर्धनासाठी श्रमदान
गणेश विसर्जनानंतर धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागल्यापासून आनंदग्राममधील मुलांनी दर आठवड्याला श्रमदान केले. प्लॅस्टिक कचरा गोळा करून पाणीसाठा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दुष्काळात पाण्याचा आधार टिकविण्यासोबतच जलस्रोतांचे संवर्धन करण्याचा संदेशही उपक्रमातून देण्यात आला.
-----
गणेश विसर्जनापासून आम्ही दर आठवड्याला धरणावर येऊन परिसर स्वच्छ करतो. दुष्काळात पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दिवाळीत प्रत्येक जण आपल्यासाठी मौल्यवान असलेल्या संपत्तीचे पूजन करतो. आमच्यासाठी हा पाणीसाठाच खरी लक्ष्मी आहे. बिंदुसरा माईनेच आपल्याला जगवले आहे. तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही विधिवत लक्ष्मीपूजन केले.
-दत्ता बारगजे, संचालक, आनंदग्राम/इन्फंट इंडिया, बीड
-----
ABD26J82975
बीड : बिंदुसरा नदीकाठावर पणत्या प्रज्वलित करून पूजन करताना आनंदग्राम संस्थेतील मुले आणि संचालक दत्ता बारगजे.