शासकीय कार्यालयांत
बायोमेट्रिक हजेरीचे आदेश
विभागीय आयुक्तांकडून तक्रारीची दखल; जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्यवाहीच्या सूचना
कळंब, ता. ११ (बातमीदार) : धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक हजेरी प्रणालीद्वारे नोंदवून, त्यानुसारच मासिक वेतन अदा करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. याची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील ६४ विविध शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना स्वतंत्र आदेश देऊन तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या कार्यालयांमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसील, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, पाणीपुरवठा, वन, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, भूमी अभिलेख, कोषागार, नोंदणी व मुद्रांक, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कामगार, सामाजिक न्याय, परिवहन, कारागृह, माहिती व जनसंपर्क आदी विभागांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित कार्यालयप्रमुखांना केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदार मुळे यांनाही कळविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
.........................
((कोट))
बायोमेट्रिक हजेरीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित होण्यास मदत होईल. त्यातून कार्यालयीन शिस्त, प्रशासकीय पारदर्शकता आणि सार्वजनिक निधीतून होणाऱ्या वेतन खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
- राहुल मुळे, सामाजिक कार्यकर्ते, कळंब