एमआयएमच्या प्रस्तावाला भाजपच्या महापौरांचा होकार
----
सभा तहकूब, गौरी-गणपतीचा उल्लेख करत विरोधी पक्षाचे ‘सोशल इंजिनिअरिंग’
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. १८ : साडेपाच वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली, तर ३३ नगरसेवक निवडून आलेला ‘एमआयएम’ हा विरोधी पक्ष बनला. सत्तास्थापनेनंतर भाजप-शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे; पण शुक्रवारी (ता. १८) झालेल्या सर्वसाधारण सभेत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी गौरी-गणपती सणानिमित्त सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी केली आणि महापौर समीर राजूरकर यांनी सभा तहकूब केली. हिंदू सणांचा मुद्दा उपस्थित करून एमआयएमने ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयत्न केल्याची चर्चा यानिमित्त सुरू झाली.
महापालिकेची शुक्रवारी महापौर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराला सर्वसाधारण सभा होती. सभेला सुरवात होताच विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी ‘सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यात आज गौरी सणानिमित्त घरोघरी प्रसाद आहे. त्यामुळे महिला सदस्यांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यास अडचण आहे. म्हणून सभा तहकूब करून नवीन तारीख जाहीर करावी’, असा प्रस्ताव ठेवला. भाजपचे नगरसेवक राजू वैद्य यांनी ‘एमआयएमला हिंदू सणांबद्दल जिव्हाळा आहे, याचे कौतुक वाटते’, असे म्हणत वैद्य यांनीदेखील सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर सभागृहनेते गोविंद केंद्रे आणि शिवसेनेचे गटनेते किशोर नागरे यांनीही अशाच भावना व्यक्त केल्याने महापौरांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एमआयएम पक्षाने हिंदू सणांचा मुद्दा उपस्थित करत ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयत्न केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली.
--
इम्तियाज जलील यांचा भगवा कुर्ता चर्चेत
दरम्यान, गुरुवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानात झालेल्या कार्यक्रमाला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील हे भगवा कुर्ता घालून आले होते. त्याची चर्चासुद्धा कार्यक्रमानंतर चांगलीच रंगली. विशेष म्हणजे, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला सुरवातीला एमआयएमने विरोध केला होता. मात्र, गुरुवारी पहिल्यांदाच इम्तियाज यांच्यासह पक्षाचे महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.