
Vidhansabha Election : भाजप प्रदेशाध्यक्षांना संभाजीनगरचा विसर!
छत्रपती संभाजीनगर - शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. काही संघटना विरोधात न्यायालयात गेल्या आहेत. सध्या प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष, दोन्ही शिवसेना, हिंदुत्ववादी संघटना शहराचा संभाजीनगर म्हणून उल्लेख करतात. याच छत्रपती संभाजीनगराचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विसर पडला आहे.
गुरुवारी (ता.आठ) राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची नावे जाहीर केली. या यादीत छत्रपती संभाजीनगरऐवजी ‘औरंगाबाद’चा उल्लेख या यादीत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील लोकसभेची ४८ तर विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहिर केली आहे. यात लोकसभेच्या यादीत संभाजीनगराचा उल्लेख आहे. तर विधानसभा मतदारसंघाच्या यादीत औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व असा उल्लेख केलेला आहे. एकीकडे नामांतराच्या विषयावरून रान उठवणारे भाजप मात्र शहराच्या नावाचा उल्लेख कोणता करावा याबाबत संभ्रमात दिसते.
शहरातील पोलिस स्थानक, बसस्थानक, सर्व सार्वजनिक ठिकाणांची नावेही छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर भाजपतर्फे शहराचा उल्लेख छत्रपती संभाजीनगराऐवजी औरंगाबाद करण्यात येत आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी काढलेल्या यादीतच हा उल्लेख आहे. यात मध्य आणि पश्चिमला औरंगाबादचा उल्लेख केला गेला आहे.
दुसरीकडे लोकसभेच्या यादीतही महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या ‘संभाजीनगर’ नावाचा उल्लेख आहे. हा उल्लेख शिंदे-फडणवीस यांनी नामांतर केलेल्या छत्रपती संभाजीनगरचा असायला हवा होता. छोट्या-छोट्या गोष्टीवरून आंदोलन करणारा भाजप शहराचे नाव औरंगाबाद छापत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.