सुनीता अरळीकर ABD26J78829
माधव बावगे ABD26J78830
-----
माधव बावगे, सुनीता अरळीकर
यांना बोधनकर स्मृती पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर, ता. ७ : यंदाचा श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते माधव बावगे यांना, तर इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार सुनीता अरळीकर यांना जाहीर झाला आहे. २७ सप्टेंबरला लातूर येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाईल.
श्यामराव बोधनकर प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष असलेल्या माधव बावगे यांना श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. बावगे हे परिवर्तनवादी चळवळीमध्ये सक्रिय आहेत. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान बोध वाहिनी व फिरते नभांगण यांसारख्या विज्ञाननिष्ठ उपक्रमांचे आयोजन त्यांनी सातत्याने केले आहे.
यंदाचा इंद्रायणी बोधनकर स्मृती पुरस्कार लातूर येथील सुनीता अरळीकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महिलांच्या उत्कर्षासाठी आणि सबलीकरणासाठी कार्य करणाऱ्या अरळीकर यांचे स्त्री भ्रूणहत्याविरोधी अभियानात मोलाचे योगदान आहे. तसेच बालविवाहविरोधी चळवळ, आंतरजातीय विवाह उपक्रमांमध्ये त्या सक्रिय आहेत. ‘हिरकणीचे बिऱ्हाड’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. २७ सप्टेंबर रोजी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, असे श्यामराव बोधनकर प्रतिष्ठानचे डॉ. पी. डी. जोशी, डॉ. राघवेंद्र चाकूरकर, जयदेव डोळे, श्रीराम जाधव, डॉ. शिरीष खेडगीकर, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, अभय बोधनकर, महेंद्र बोधनकर यांनी सांगितले.