ABD26J83361
अकोली : बोगस डॉक्टरच्या बेकायदा दवाखान्यावर कारवाई करण्यासाठी दाखल झालेले आरोग्य विभागाचे पथक.
‘मुन्नाभाई’चा रुग्णांच्या जिवाशी खेळ
-
अकोलीत मेडिकलच्या आडून चालणाऱ्या दवाखान्यावर कारवाई
वसमत, ता. १८ (बातमीदार) ः वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही गंध नसताना थेट रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. वसमत तालुक्यातील अकोली येथे औषध दुकानाच्या आडून बेकायदा दवाखाना थाटून रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका तरुणाविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १७) गुन्हा नोंदविला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीदरम्यान संबंधित तरुणाचे शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झाले असल्याचे समोर आले आहे.
अकोली येथे एक परप्रांतीय व्यक्ती कोणताही वैद्यकीय परवाना नसताना रुग्णांवर उपचार करत असल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.२० वाजता अकोली येथे अचानक छापा टाकला. या पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, आरोग्य विस्तार अधिकारी कलीम पठाण, आरोग्य सहायक जायभाये, समुदाय आरोग्य अधिकारी गजानन पतंगे आणि आरोग्य सेवक बळीराम जाधव यांचा समावेश होता. गावातील विक्रम नरोबा कदम यांच्या घराला लागून असलेल्या एका शटरमध्ये ‘रोहन मेडिकल’ नावाचे दुकान भाड्याने घेऊन तेथे हा दवाखाना चालवला जात होता. पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता, कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तरुणकुमार मलिक (वय ३५, रा. पश्चिम बंगाल) हा रुग्णांची तपासणी करताना रंगेहात आढळला. अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याने आपले शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झाल्याची कबुली दिली.
चौकट
सलाइन, इंजेक्शनचा साठा जप्त
पथकाने दुकानाची झडती घेतली असता, तेथे एक स्टेथॉस्कोप, बीपी अपारेटस (रक्तदाब मोजण्याचे यंत्र), नेब्युलायझर यासह रुग्णांवर उपचारासाठी वापरलेली रिकामी सलाईन, इंजेक्शन्स, सिरिंज आणि ॲलोपॅथी औषधांचा मोठा साठा मिळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तरुणकुमार मलिक याच्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.