तणनाशक फवारले, मात्र तण जळाले नाही.

तणनाशक फवारले, मात्र तण जळाले नाही.
Published on
बोगस तणनाशक दिल्याची तक्रार ---- सिल्लोड, ता. ४ (बातमीदार) : स्थानिक कृषी सेवा केंद्रातून बोगस तणनाशक देण्यात आल्याची तक्रार उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केली आहे. या प्रकरणी पंचायत समिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. उंडणगाव येथील शेतकरी मनोज बसैय्ये यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावावर असलेल्या साडेचौदा एकर क्षेत्रावर त्यांनी मका लागवड केली. मकातील तण जाळण्यासाठी त्यांनी स्थानिक कृषी सेवा केंद्रातून दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे तणनाशक घेऊन फवारणी केली. मात्र, तण जळाले नाही. याची माहिती त्यांनी कृषी सेवा केंद्र चालकासह संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली. पण त्यांनी याविषयी काणाडोळा करून उडवाउडवीचे उत्तर दिले. याप्रकरणी बसैय्ये यांनी कृषी विभागाकडे बोगस तणनाशक दिल्याची तक्रार दाखल केली; परंतु अद्यापही शेतकऱ्याला ठोस उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे. संबंधित कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. --------- ((कोट)) संबंधित मका पिकाची पाहणी करून तणनाशकाचे नमुने घेतले आहे. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. -एस. एस. सूर्यवंशी, कृषी अधिकारी, पंचायत समिती --------- ((कोट)) माझ्या साडेचौदा एकर क्षेत्रावरील मका पिकात तणनाशक फवारणी केली. मात्र, तण जळाले नाही. याविषयी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहे. मोठा खर्च करूनदेखील मला बोगस तणनाशक दिल्यामुळे संबंधितावर कारवाई करून मला नुकसानभरपाई द्यावी. -मनोज बसैय्ये, शेतकरी, उंडणगाव
Marathi News Esakal
www.esakal.com