बोगस शिक्षक मान्यता घोटाळ्याच्या
चौकशीला ‘समिती बदलां’चा फेरा
-----
बीड, ता. २ : जिल्हा परिषद शिक्षण विभागात २००६ ते २०१२ या कालावधीत जावक रजिस्टरमध्ये छेडछाड करून आणि टायपिंग केलेले बनावट कागद चिटकवून तब्बल दीड हजार बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य मान्यता दिल्याचा महाघोटाळा ‘सकाळ’ने उघडकीस आणला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला तीनवेळा चौकशी समित्या बदलाव्या लागल्या आहेत. चौकशीत नेमका कोणाचा दबाव आहे आणि ही फेरबदल मालिका कशासाठी सुरू आहे, याबाबत आता तीव्र शंका उपस्थित होत आहेत.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. इंजि. सादिक बाबूमियाँ इनामदार यांनी घोटाळ्याविरोधात आणि जावक रजिस्टरमधील फेरफारबाबत पुराव्यासहित तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी सुरवातीला त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. मात्र, समितीच्या अध्यक्षांनी विविध कारणांमुळे ही चौकशी करण्यास असमर्थता दर्शवत समिती नको असल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर प्रशासनाला समित्यांमध्ये बदल करावे लागले. वारंवार समित्या बदलल्यामुळे उच्चस्तरीय चौकशीवर आणि पारदर्शकतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारदाराने या संपूर्ण घोटाळ्याची पोलखोल करण्यासाठी माहिती अधिकाराअंतर्गत कागदपत्रे व माहिती मागितली होती. मात्र, संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठीच सर्व खटाटोप सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
-----
शिक्षण विभागातील बोगस शिक्षक भरती आणि जावक रजिस्टरमधील फेरफार हा गंभीर प्रकार आहे. चौकशी समित्या बदलणे आणि माहिती देण्यास टाळाटाळ करणे, यावरून प्रशासकीय पातळीवर कुणाला तरी पाठीशी घातले जात आहे.
- प्रा. इंजि. सादिक बाबूमियाँ इनामदार, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष
-----
तक्रारदारांनी मागितलेली माहिती देणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की नाही, याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर माहिती उपलब्ध करून देणार.
- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्रा.), बीड