बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात
माजलगाव ः छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा १३ वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. अपुरा पाऊस व नुकसानीमुळे शेतकरी संकटात असले तरी, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऊस उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष मोहन जगताप यांनी सांगितले. सावरगाव येथील कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा अग्निप्रदीपन सोहळा अध्यक्ष बाजीराव जगताप, संचालक संतोष यादव व त्यांच्या पत्नी दुर्गा यादव यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पार पडला. शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मान आणि योग्य मोबदला मिळण्यासाठी कारखाना सकारात्मक प्रयत्न करेल, असा विश्वास मोहन जगताप यांनी व्यक्त केला. नव्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन करण्यात आले.
-------
ग्लोबल विकास ट्रस्टच्या उपक्रमाला हिरवा कंदील
सिरसाळाः ग्लोबल विकास ट्रस्टने बीड जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या व्यापक उपक्रमाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलनायक मयंक गांधी यांना पत्र पाठवून या उपक्रमाचे स्वागत केले. या पत्राची प्रत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही देण्यात आली आहे. लवकरच ट्रस्ट व प्रशासन यांच्यात सामंजस्य करार होईल. या आराखड्यात ५० हजार शेतकऱ्यांसाठी उपजीविका आणि १५ हजार शेतकऱ्यांना रेशीम शेतीशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच १००० किलोमीटर नद्यांचे पुनरुज्जीवन, १५० केटी वेअर, ५०० सिमेंट नाला बांध आणि १००० शेततळी उभारली जातील. या सहकार्यामुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत जलद मदत पोहोचेल, असा विश्वास मयंक गांधी यांनी व्यक्त केला.
-------
ग्रामीण विकास मंडळाकडून डॉ. कलाम जयंती
अंबाजोगाई ः येथील ग्रामीण विकास मंडळाच्या सखी निवासातील महिला व मुलींनी गुरुवारी डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम चौकाची स्वच्छता करून त्यांना अभिवादन केले. संस्था परिसरातील झाडांना पाणी देऊन जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष एस.बी. सय्यद होते, तर अभियंता प्रकाश गडदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. कलाम यांची पुस्तके सखी निवासमध्ये वाचनासाठी ठेवणार असून, यावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन बक्षिसे देण्याचा मानस एस.बी. सय्यद यांनी व्यक्त केला. यावेळी अभियंता प्रकाश गडदे, काजल मुंडे आणि आशा बनसोडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण लुंगेकर यांनी केले, तर आभार तुकाराम गायकवाड यांनी मानले.
------
गेवराई तहसील कार्यालयात अरेरावी;
संतप्त कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
बीड ः शासकीय कामासाठी गेलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहरप्रमुख राजू शेख यांना तहसील कार्यालयातील कर्मचारी विलास राठोड आणि नायब तहसीलदार सुभाष कट्टे यांनी अरेरावी करत जातीवाचक टिप्पणी केल्याचा प्रकार घडला. या मुजोरीविरोधात संतप्त कार्यकर्त्यांनी थेट तहसीलदारांच्या केबिनमध्येच ठिय्या आंदोलन केले. जिल्हाप्रमुख उल्हास गिराम पाटील यांनी तातडीने धाव घेत प्रशासनाला धारेवर धरून कठोर कारवाईची मागणी केली. प्रशासनाने चौकशीचे ठोस आश्वासन दिल्यानंतर उल्हास गिराम पाटील यांच्या आवाहनानुसार आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. यावेळी अजय दाभाडे, मिराताई नवले, राहुल चाळक, राजू बाबूलाल शेख, रफिक बागवान आणि मुस्तफा भाई यांच्यासह सर्वधर्मीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
-----
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत माजलगावच्या खेळाडूंची सुवर्णभरारी
माजलगाव ः जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत येथील कराटे मार्शल आर्ट असोसिएशन आणि द यूथ शोतोकान कराटे डू अकॅडमीच्या दहा खेळाडूंनी सुवर्णपदके पटकावत उल्लेखनीय यश मिळविले. १२ व १३ ऑक्टोबरला झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटातून सृष्टी जाधव, आरोही सोबने, शिवानी बादाडे, आराध्या राक्षे, अनन्या मुंडे आणि प्राची मस्के यांनी सुवर्णपदक मिळविले. मुलांच्या गटातून यशवंत सक्राते, मयूरेश अस्वले, कार्तिक चौरे आणि संतोष जंगले यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. खेळाडूंनी मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर हे यश संपादन केले. या खेळाडूंना चंद्रमणी डोंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कामगिरीचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.
-------
देवखेडा गोशाळेत चारा वाटप
माजलगाव ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून देवखेडा गोशाळेतील गोमातेला गुरुवारी भाजपचे शहर मंडळ अध्यक्ष विनायक रत्नपारखी यांच्या वतीने चारा वाटप करण्यात आले. तसेच जिजामाता नगर येथील तुळजाभवानी मंदिरात महापूजा व महाआरती करत परतीच्या पावसासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी भाविकांना फराळाचे वाटप झाले. याप्रसंगी ज्ञानेश्वर मेंडके, अरुण राऊत, डॉ. अशोक तिडके, डॉ. प्रशांत पाटील, अभय होके पाटील, प्रशांत भानप, प्रभाकर साळेगावकर, डॉ. स्वानंद कुलकर्णी, सुधाकर देशमुख, बाळासाहेब देशपांडे, अविनाश कांडूरे, अर्जुन नाईकनवरे, जयंत अकोलकर, सुनील मोगरेकर, बाळासाहेब क्षीरसागर, अनंत कुलकर्णी, दत्ता महाजन, विनोद लड्डा, शहाजी सोळंके, मनोज कोरडे, गोपाळ कुलकर्णी, पापा सोळंके, डॉ. सचिन देशमुख, निरंजन वाघमारे, डॉ. आनंद लोढा व नितीन नाईकनवरे उपस्थित होते.