पोलिस पाटील मुख्यालयी राहत नसल्याने गैरसोय
-----------------------
बोरी ठाण्यांतर्गत अनेकांचे अप-डाऊन; ग्रामस्थांची गैरसोय
बोरी, ता.१७ (बातमीदार) : बोरी पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांचे पोलिस पाटील आपल्या मूळ गावी म्हणजेच मुख्यालयात राहत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पोलिस पाटील गावात उपस्थित नसल्याने किरकोळ वाद, चोरीच्या घटना, अवैध धंदे आणि रात्रीच्या गस्तीवर परिणाम होत असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बोरी पोलिस ठाण्यात अंतर्गत साठ गावे असून ४६ ठिकाणी पोलिस पाटील कार्यरत आहेत. पंधरा ठिकाणी बोरी, बोरी तांडा, नागापूर,वस्सा, पिंपळगाव गायके, पार्डी टाकळी, शेवडी, गोंधळा, निवळी खुर्द, मुडा, देवगाव धानोरा, अघाव वाडी, चितनर वाडी, कौडगाव बुद्रूक व कान्हड याठिकाणी पोलिस पाटील पद रिक्त आहे. बोरी पोलिस ठाण्यात अंतर्गत जिंतूर, औंढा नागनाथ व सेलू तालुक्यातील गावे आहेत. पोलिस पाटील यांना पंधरा हजार मानधन शासनाच्या वतीने पगार मिळतो. नियमानुसार पोलिस पाटील यांना आपल्या कार्यक्षेत्रातील गावातच वास्तव्य करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावचे पोलिस पाटील इतरत्र ठिकाणावरून अप-डाऊन करतात. यामुळे गावात रात्री-बेरात्री काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने माहिती देण्यासाठी किंवा पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ग्रामस्थांना ताटकळत राहावे लागते. पोलिस प्रशासनाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती सद्यःस्थितीत अनेक गावांत कार्यरत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
((चौकट)))
कायद्याचा वचक कमी
पोलिस पाटील हे गाव पातळीवरील पोलिस प्रशासनाचा कणा मानले जातात. प्रत्येक घडामोडींची माहिती शासनाला देणे, शांतता राखणे ही त्यांची मुख्य जबाबदारी. परंतु मुख्यालयात राहत नसल्याने वचक कमी झाला आहे. देवगाव धानोरा (ता. जिंतूर) येथील पोलिस पाटील पद रिक्त आहे.
-रामदास इप्पर, देवगाव धानोरा
((कोट)))
कायदा व सुव्यवस्था अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी गावस्तरावर पोलिस पाटील यांची निवड शासनाकडून केली जाते. परंतु काही गावांत पोलिस पाटील राहत नसल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-शिवसांभ स्वामी,
सहायक पोलिस निरीक्षक, बोरी
--------------