तीन महिन्यांत बोरीच्या शाळेचा कायापालट! देशमुख, सोळुंके शिक्षक दाम्पत्याच्या उपक्रमशीलतेला ग्रामस्थांची साथ; आठवरून २२ वर पोहोचली विद्यार्थीसंख्या.

तीन महिन्यांत बोरीच्या शाळेचा कायापालट! देशमुख, सोळुंके शिक्षक दाम्पत्याच्या उपक्रमशीलतेला ग्रामस्थांची साथ; आठवरून २२ वर पोहोचली विद्यार्थीसंख्या.
Published on
((फोटो देणार आहे)) .................... बोरीच्या शाळेचा तीन महिन्यांत कायापालट रंगरंगोटी, वृक्षारोपणासह राबविला विद्यार्थी बँक उपक्रम येरमाळा, ता. १५ (बातमीदार) : शिक्षकांनी मनापासून कामाला सुरवात केली आणि ग्रामस्थांनी त्यांना साथ दिल्याने बोरी येथील जिल्हा परिषद शाळेचा कायापालट झाला. त्यावरून ग्रामीण भागातील शाळेचे चित्र बदलण्यासाठी मोठ्या निधीची नव्हे, तर इच्छाशक्तीची गरज असते, हे वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिले आहे. जूनमध्ये शाळेत रुजू झालेल्या उपक्रमशील शिक्षक दांपत्याने अवघ्या तीन महिन्यांत शाळेचा कायापालट केला आहे. केवळ जुन्या इमारतीची रंगरंगोटी न करता त्यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी आपलेपणाची भावना निर्माण केली. शाळेची जुनी इमारत, परिसरातील अस्वच्छता आणि कमी पटसंख्येमुळे शाळेचे अस्तित्व जणू दुर्लक्षित झाले होते. मात्र, देशमुख-सोळुंके दांपत्याने या परिस्थितीकडे समस्या म्हणून न पाहता ती बदलाची संधी मानली. त्यांनी स्वखर्चातून शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. शिक्षकांचा पुढाकार पाहून ग्रामस्थही पुढे आले. लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यात आले. तसेच शाळेत पाण्याची टाकी बसविण्यात आली. या बदलामुळे शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्येही उत्साह वाढला आहे. त्याचा थेट परिणाम पटसंख्येवर झाला. पूर्वी अवघे आठ विद्यार्थी असलेल्या शाळेची पटसंख्या अवघ्या काही महिन्यांत २२ वर पोहोचली आहे. शाळेतील बदल पाहून पालक आणि ग्रामस्थांचा विश्वास वाढला आहे. शाळा ही केवळ विद्यार्थ्यांची नसून संपूर्ण गावाची जबाबदारी आहे, अशी भावना निर्माण झाली आहे. शिक्षक शीतल अशोकराव सोळुंके यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाथवाडी (ता. कळंब) येथे कार्यरत असताना शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविले. शिक्षण गुणवत्ता अभियानातील पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी शाळेला भेट दिली. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. तर त्यांचे पती सुधीर मोहन देशमुख यांनी शेलगाव (ता. कळंब) येथे कार्यरत असताना गेल्या दोन वर्षांत पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत शंभर टक्के विद्यार्थी पात्र होण्यासाठी योगदान दिले. शाळेची रंगरंगोटी, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्यासाठी ‘विद्यार्थी बँक’ आदी उपक्रमही त्यांनी यशस्वीपणे राबविले. ३५ वर्षांनंतर शाळेला नवसंजीवनी बोरी गावातील शाळेची स्थापना १९६२ मध्ये झाली. पूर्वी ही शाळा देवळात भरत असे. शाळेसाठी तुकाराम सुरवसे यांनी रस्त्याच्या पश्चिमेला ३५ वर्षांपूर्वी, तर बाबूराव ज्ञानबा घायाळ यांनी रस्त्याच्या पूर्वेला ३० वर्षांपूर्वी जागा दिली होती. तब्बल ३५ वर्षांनंतर देशमुख-सोळुंके शिक्षक दांपत्याच्या उपक्रमशीलतेमुळे शाळेला नवी ओळख मिळत आहे. त्यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा वाढला असून, शाळेच्या माध्यमातून यंदा विविध सांस्कृतिक उपक्रम घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. बोरीच्या शाळेतील हा बदल केवळ भिंतींवर चढलेल्या रंगाचा नसून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाचा आणि ग्रामस्थांच्या मनात निर्माण झालेल्या आपलेपणाचा आहे. शिक्षकांनी पुढाकार घेतला आणि गावाने खंबीरपणे साथ दिली, तर ग्रामीण शाळाही आदर्श शाळा होऊ शकते, याची प्रेरणादायी सुरवात बोरीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com